scorecardresearch

१२८ मिनिटांत २८ राज्यांतील गोड खाद्यपदार्थ!; विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

अवघ्या १२८ मिनिटांमध्ये २८ राज्यांतील गोड खाद्यपदार्थ तयार करून देशाच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन सोमवारी घडविण्यात आले.

pv make food
१२८ मिनिटांत २८ राज्यांतील गोड खाद्यपदार्थ

पुणे : अवघ्या १२८ मिनिटांमध्ये २८ राज्यांतील गोड खाद्यपदार्थ तयार करून देशाच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन सोमवारी घडविण्यात आले. ‘स्टेट स्वीट मॅरेथॉन ऑफ इंडिया’ या उपक्रमातून प्रसिद्ध शेफ सर्वेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल मॅनेजमेंटच्या २८ विद्यार्थ्यांनी देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त केलेल्या या विक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने नोंद घेतली. विद्यार्थ्यांनी साकारलेले हे गोड पदार्थ सामाजिक जाणिवेच्या भावनेतून २८ सामाजिक संस्थांना भेट देण्यात आले.

सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आणि दुपारी बारा वाजून आठ मिनिटे या निर्धारित वेळेच्या आधी तीन मिनिटे हा उपक्रम संपला. शेफ सर्वेश यांनी २०१७ मध्ये जगातील सर्वात लहान पिझ्झा बनविण्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविली होती. आजच्या ‘स्टेट स्वीट मॅरेथॉन ऑफ इंडिया’ या उपक्रमाद्वारे त्यांनी दुसरा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साकारला आहे. पुणे रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार, रचना पाटील, कृणाल घोडके, वैशाली मालपाणी, तृप्ती सरोदे आणि गायत्री कुलकर्णी यांनी अंतर्गत परीक्षक म्हणून काम पाहिले. पुणे जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद आणि संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> महापालिकेकडून गोवर आजाराचे सर्वेक्षण; दाट लोकवस्ती भागात एकही रुग्ण नसल्याचा आरोग्य विभागाचा दावा

महाराष्ट्राचा उकडीचा मोदक, पंजाबची पिन्नी, आसामचा नारीको लारू, गुजरातची बासुंदी, छत्तीसगडचा कुर्मा, राजस्थानची फिरनी, कर्नाटकचा म्हैसूरपाक, अरुणाचल प्रदेशाचे खापसे, मणिपूरची चखवा खीर, तेलंगणाचा शाही तुकडा, आंध्रप्रदेशचे पुथारे कुल, त्रिपुराचे आवान बांगवी, मिझोरामचा कोट पेठा, उत्तरप्रदेशची बालुशाही, हरियाणाची अलसी पिन्नी असे विविध राज्यांची ओळख असणारे गोड पदार्थ तयार करण्यात आले. निर्धारित वेळ संपण्याच्या काही मिनिटे आधी सर्व पदार्थांची मांडणी सुयोजित ठिकाणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 09:22 IST