पुणेः ‘निरोगी आरोग्याची काही ठरलेली लक्षणे असतात, तसेच शरीरात उद्भवणाऱ्या छोट्या-मोठ्या तक्रारीही अनेक आजारांचे संकेत देत असतात. शरीरातील विविध अवयवांप्रमाणेच पायांवर येणारी सूजही आरोग्याबाबत महत्त्वाचे संकेत देऊ शकते. दीर्घकाळ उभे राहणे, थकवा, आहारातील बदल किंवा किरकोळ कारणांमुळेही सूज येऊ शकते. त्यामुळे घाबरून न जाता या लक्षणाकडे दुर्लक्षही करू नये,’ असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला.

पायाला येणाऱ्या सुजेबाबत विविध आरोग्यतज्ज्ञांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आपली मते मांडली. ‘पायावर येणाऱ्या सुजेला वैद्यकीय भाषेत ‘पेडल एडेमा’ म्हणतात. याची कारणे आणि लहान मुलांच्या पायांवर येणाऱ्या सुजेची कारणे यांत मोठा फरक असतो. तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमध्ये अनेकदा लसीकरणानंतर इंजेक्शन दिलेल्या जागी पायावर सूज दिसते. तसेच संसर्ग, ॲलर्जी किंवा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही मुलांच्या पायांवर सूज येऊ शकते. त्यामुळे मुलांमध्ये दिसणारी सूज ही प्रौढांपेक्षा वेगळ्या कारणांमुळे निर्माण होत असल्याने तिच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.’

सूज कशी ओळखावी?

आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले, की बऱ्याचदा पायाच्या खालच्या भागावर सूज असते. ती एवढी असते, की तुमच्या बोटांचे ठसेही सहज उमटतील. अशा वेळी द्रव साचल्याचे सांगितले जाते. बऱ्याचदा पायाला मुंग्या येणे, पाय जड वाटणे, संवेदना नाहीशी होणे, अचानक सूज आल्यावर त्वचा ताणली जाणे किंवा चमकदार दिसणे अशी लक्षणे पायावर दिसतात.’

सूज येण्याची कारणे

सूज का येते, यावरही वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. तज्ज्ञ म्हणतात, ‘शरीरातील अवयव योग्य काम करीत नाहीत. अशा वेळी पायांवर सूज चढू शकते. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, यकृत यांचा समावेश होतो. तसेच, किडनीचे आजार अथवा यूरिक ॲसिडच्या असंतुलनामुळेही पाय सुजतात. ज्यांना संधिवाताचा आजार असतो, अशांच्या पायांवर हमखास सूज असते. बऱ्याच वेळा पायामध्ये रक्ताची गुठळी होते. योग्य रक्तपुरवठा न झाल्यानेदेखील सूज येऊ शकते.’

‘वैद्यकीय सल्ला घ्यावा’

सूज आल्यावर लगेच ते गंभीर आजाराचे लक्षण असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. ‘बऱ्याचदा किरकोळ कारणांमुळेही सूज येते आणि दोन ते तीन दिवसांत ओसरते. मात्र, दीर्घकाळ पायावर सूज राहत असेल आणि ही सूज चेहऱ्यावर शरीराच्या अन्य भागांवरही पसरत असेल, तर अशा वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा,’ असे तज्ज्ञ म्हणतात.

या गोष्टी टाळा

  • ज्या वेळी पायांवर सूज येते तेव्हा घट्ट बूट किंवा उंच टाचेच्या चपला घालणे टाळा.
  • पायावर सूज आल्यास दीर्घ काळ उभे राहणे टाळा.
  • आहारात मिठाचा वापर कमी करा.
  • धूम्रपान, मद्यपान टाळा.
    (वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार)

हे उपाय करा

  • पायावर सूज असेल, तर पायांची हालचाल करणे, व्यायाम करणे.
  • शरीरातील पाण्याची पातळी वाढवणे
  • सूज आल्यास दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे
  • पायावरील सूज कमी करण्यासाठी पाय उंच भागावर उचलून ठेवणे किंवा पायाखाली उशी घेणे.
  • सूज कमी करण्यासाठी आहारात मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमयुक्त पदार्थ घ्यावेत. ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, रताळे, कडधान्ये यांचा समावेश होतो.
    (वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार)

मुळात शरीरावर येणारी, विशेषतः पायांवर येणारी सूज ही शरीरात असणाऱ्या अनेक आजारांचे संकेत देते. त्यामुळे पायावर सूज येणे म्हणजे गंभीर आजार असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. मात्र, दीर्घकाळ सूज असेल, तर याची कारणे अनेक असू शकतात. यकृत, किडनी, हृदयविकार, युरिक ॲसिड यांसारख्या गंभीर आजारांमध्येही पायावर सूज येते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला आणि गरज वाटल्यास विविध चाचण्या केल्यावर लवकर निदान होण्यास मदत होते. – डॉ. अनिकेत जोशी, जनरल फिजिशिअन

बऱ्याच वेळा खूप वेळ उभे राहिल्याने ‘व्हेरिकोज व्हेन्स’सारखे आजार झाल्याने पायांवर सूज येते. पायावर येणारी सूज ही रक्तवाहिन्या आणि हृदयविकाराशी संबंधित असू शकते. तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल, तर पायावर येणारी सूज दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण अशा वेळी ही सूज आपल्याला शरीरात असणाऱ्या गंभीर आजाराविषयी सूचना देते. – डॉ. रवींद्र पन्नालाल छाजेड, मधुमेहतज्ज्ञ