पुण्यातील सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाचा ‘लिबरल आर्ट्स’चा अभ्यासक्रम चार वर्षे चालवण्याची परवानगी पुन्हा एकदा विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मागितली असून हा अभ्यासक्रम बंद न करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्यापरिषदेत घेण्यात आला.
दिल्ली विद्यापीठातील चार वर्षे कालावधीमध्ये चालवण्यात येणारा पदवी अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने बंद करायला लावल्यानंतर आता पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठाचा लिबरल आर्ट्सचा अभ्यासक्रमही बंद करण्यात यावा, असे पत्र आयोगाने दिले आहे. या अभ्यासक्रमाबाबत २४ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याची सूचना आयोगाने विद्यापीठाला केली होती.
आयोगाच्या पत्रानंतर विद्यापीठाच्या विद्यापरिषद आणि व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. लिबरल आर्ट्सचा हा अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचाच असणे का आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाची रचना कशी आहे, याबाबत विद्यापीठाकडून आयोगाला पत्र पाठवण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम आहे त्या स्वरूपातच सुरू ठेवण्यासाठी विद्यापीठाकडून आयोगाकडे पुन्हा एकदा परवानगी मागण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या या भूमिकेबाबत पुढील आठवडय़ात होणाऱ्या आयोगाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.