सहानुभूतीच्या आधारे नियमबाह्य़ अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा डाव?

विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन नंतर ‘अभ्यासक्रम बंद कसा करायचा..’ अशी सहानुभूती मिळवत हे अभ्यासक्रम सुरूच ठेवण्याचा प्रयत्न संस्थांकडून करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे नामांतर न करताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही संस्थांनी या नियमात न बसणाऱ्या अभ्यासक्रमांचे प्रवेश बिनबोभाटपणे केले आहेत. अजूनही एमपीएम, एमएमएम अशा जुन्याच नावाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता न घेताच हे अभ्यासक्रम चालवले जात आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन नंतर ‘अभ्यासक्रम बंद कसा करायचा..’ अशी सहानुभूती मिळवत हे अभ्यासक्रम सुरूच ठेवण्याचा प्रयत्न संस्थांकडून करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एखादी बेकायदेशीर किंवा नियमबाह्य़ गोष्ट करायची आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित घटकांना सहानुभूती दाखवत नियमबाह्य़ गोष्ट नियमित करून घ्यायची. हे एरवी बेकायदा बांधकामांच्या बाबतीत रूढ झालेले समीकरण आता पुण्यातील शिक्षणक्षेत्रातही फोफावले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या एमपीएम, एमएमएम, एमसीएम यासारख्या पदव्यांचे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय गेली अनेक वर्षे बिनबोभाटपणे चालवण्यात येत होते. व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी लागू असणारे सर्व नियम धाब्यावर बसवून हे अभ्यासक्रम चालवले जात होते. आता या सर्व अभ्यासक्रमांचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राजपत्राप्रमाणे नामांतर करूनच हे अभ्यासक्रम चालवण्यात यावेत, अशी स्पष्ट सूचना विद्यापीठाने दिली होती. नामांतर करण्याबरोबरच बदललेल्या नावासाठी एआयसीटीईची मान्यता घेऊनच हे अभ्यासक्रम चालवण्यात यावेत, असेही विद्यापीठाने म्हटले होते. मात्र यातील कोणत्याही सूचनेला संस्थांनी किंमतच दिलेली नाही. जुन्याच नावाने आणि कोणत्याही अधिकार मंडळाची परवानगी न घेता अभ्यासक्रम सुरूच आहेत. या अभ्यासक्रमांची जाहिरातबाजीही सुरू आहे. पुण्यातील नावाजलेल्या संस्थाही यामध्ये आघाडीवर आहेत. पदव्यांचे नामांतर न करता एमपीएम, एमएमएम, एमसीएम याच पदव्या देण्यात येणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. अभ्यासक्रमाला विद्यापीठाची मान्यता असल्याचेही काही संस्था सांगत आहेत. शंका उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘हे अभ्यासक्रम इतके वर्ष सुरू आहेत, आता कुणी बंद करू शकत नाहीत..’ असे उत्तरही काही संस्थांकडून देण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच अभ्यासक्रमांच्या नामांतराचा निर्णय घेऊन संस्थांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही या नियमबाह्य़ अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे आणि त्यानंतर हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, या मुद्दय़ावर सहानुभूती मिळवायची असा प्रयत्न शिक्षणसंस्थांकडून करण्यात येतो आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठाने मात्र व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांच्या या कारभाराकडे काणाडोळा करण्याचेच धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. मात्र, या अभ्यासक्रमांना एआयसीटीई परवानगी नाकारून प्रवेश रद्द केल्यास त्याचे परिणाम मात्र विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत.
प्रवेश घेताना काय काळजी घ्याल
– व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना ज्या नावाने पदवी दिली जाणार आहे, त्याला मान्यता आहे का, याची खातरजमा करावी. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची  मान्यता आणि विद्यापीठाची संलग्नता तपासणे आवश्यक आहे. परिषदेकडून महाविद्यालयाला मान्यता असणे आणि चालवल्या जाणाऱ्या एखाद्या अभ्यासक्रमाला मान्यता असणे या स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यामुळे या दोन्हीच्या मान्यतेची संस्थेकडे विचारणा करावी. काही वेळा परिषदेची मान्यता आवश्यक नसल्याचे उत्तर शिक्षणसंस्थेकडून देण्यात आले, तरीही तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना परिषदेची मान्यता असणे आवश्यकच असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sympathy ugc management courses