पिंपरी : तळेगाव ते चाकण दरम्यान २६.३० किमीचा चौपदरी उन्नत मार्ग आणि त्याखाली समांतर रस्ता बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम जानेवारी २०२७ अखेर पूर्ण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
पुण्यातील औद्योगिक क्षेत्रांतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३.२० किमी लांबीच्या उन्नत महामार्गाचे भूमिपूजन १७ जुलै रोजी झाले आहे. या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान २६.३० किमीचा चौपदरी उन्नत मार्ग आणि त्याखाली समांतर रस्ता बांधण्यात येणार असून, एकूण ६,१५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डुडी म्हणाले,‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा रस्ता पूर्ण झाल्यास ५० टक्के वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तळेगाव ते चाकण दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू आहे. शेवटचा ८०० मीटरचा भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) आहे. त्या जागेच्या भूसंपादनासाठी सहा महिने लागतील. या रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण केले जाणार आहे.’
नाशिक फाटा ते खेड (राजगुरुनगर) दरम्यानच्या प्रस्तावित २८ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. महिन्याभरात त्याचे काम सुरू होईल. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर शंभर टक्के वाहतूक कोंडी सुटेल. आजमितीला ९७ टक्के जागेचे भूसंपादन झाले आहे. तीन हेक्टर जमिनीचे भूसंपादन पिंपरी महापालिका हद्दीतील बाकी आहे. सप्टेंबरअखेर त्याचे भूसंपादन पूर्ण होईल. हा रस्ता निर्णायक ठरेल. या प्रकल्पामुळे भविष्यात चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘एआय’चा वापर
चाकण एमआयडीसी परिसरातील ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी, वाहन बंद पडल्याचे दिसेल. त्यानुसार तत्काळ कार्यवाही केली जाईल. या पद्धतीने वाहतूक कोंडी सोडविली जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
प्रशासनाचे नियोजन चुकले
खड्डे, साईड पट्ट्या, रस्त्यावर उभी केली जाणार वाहने, अतिक्रमण, नियमांचे उल्लंघनामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे चाकणमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविणार
रस्त्यांची दुरवस्था असून खड्डे, साईट पट्टे खराब आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन कोंडी होत आहे. कामगारांचे सकाळी दोन आणि सायंकाळी दोन असे चार तास वाहतूक कोंडीत जातात. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्यात येणार आहेत. एकही दिवस विलंब झाल्यास अभियंते, कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. कंत्राटदार कोणाचा, कोणाशी संबंधित आहे, याच्याशी काही देणेघेणे नाही. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावली प्रमाणे खड्डे बुजविले जातील. त्याचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. ज्या संस्था जबाबदारी पाळणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
