पिंपरी : अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे पोलीस ठाण्याजवळील जुन्या पुलाचा भराव खचल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक १४ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. चाकण, तळवडे व महिंद्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एच.पी. चौक, इंड्युरन्स चौक, सिग्मा, व्ही.डब्ल्यू. कॉर्नर, एआर-एआय चौक, स्पायसर चौक तसेच महिंद्रा सर्कल मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चाकणहून येणाऱ्या वाहनांसाठी वाघजाईनगर, बिरदवाडी चौक आणि म्हाळुंगे गाव कमान-आंबेठाण मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहनचालकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
दोन दुकाने फोडून ४१ हजारांची चोरी
दोन वेगवेगळ्या दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी ४१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी (६ जुलै) रात्री तीन वाजण्याच्या सुमारास मोशीत घडली. याप्रकरणी तिघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या ट्रेडिंग कंपनी तसेच शेजारीच असलेल्या दूध डेअरी या दोन्ही दुकानांचे शटर कोणत्यातरी साधनांच्या साहाय्याने उचकटले. चोरट्यांनी दुकानांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून काउंटरच्या ड्रॉवरमधून ११ हजार रुपये आणि दूध डेअरीच्या काउंटरच्या ड्रॉवरमधील रोकड असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (६ जुलै) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील काळेवाडी स्मशानभूमीजवळ घडली. पोलिस अंमलदार तुषार शते यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर शराफत उस्मानी (वय २०, चांदणी चौक, जगतापनगर जवळ, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत शस्त्रे बाळगण्यास बंदी आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपी समीर हा आपल्या ताब्यात एक धारदार लोखंडी कोयता घेऊन काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरताना मिळून आला. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ही कारवाई केली असून काळेवाडी पोलिस तपास करीत आहेत.
