पुणे : पुण्यातील तळेगाव, चाकण, शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्याचा वेगाने विस्तार होत आहे. या औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उन्नत महामार्गासह सध्याच्या महामार्गाचे विस्तारीकरणाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या ५ हजार ९२३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्या (दि.१७) भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील महत्वाच्या औद्योगिक क्षेत्रांतील कोंडी सुटणार आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या विस्तारीकरणासह उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा महामार्ग सध्या दुपदरी आहे. या प्रकल्पातील तळेगाव ते चाकण हा २६.३० किलोमीटरचा चौपदरी उन्नत मार्ग असेल आणि त्याखाली जमिनीला समांतर चौपदरी महामार्ग असेल. तळेगाव ते शिक्रापूर हा चौपदरी महामार्ग असेल. हा प्रकल्प एकूण ५३.२० किलोमीटरचा असेल. जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. या प्रकल्पासाठी ३८.७९ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असेल. चाकण हे पुण्यातील आघाडीचे औद्योगिक केंद्र आहे. चाकण परिसरात वाहननिर्मिती उद्योगाची परिसंस्था विकसित झाली आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पामुळे चाकणमधून जेएनपीटी आणि मुंबई-नाशिक पट्ट्याशी जलद जोडणी होणार आहे. त्यामुळे हा प्रवासाचा वेळ कमी होऊन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे.

या महामार्गाची सध्याची क्षमता प्रतिदिन १० हजार प्रवासी वाहने आहे. या महामार्गावरून सध्या होणारी वाहतूक प्रतिदिन ३१ हजार १९७ प्रवासी वाहने आहे. भविष्यात या महामार्गाची क्षमता ८८ हजार ८४१ प्रवासी वाहने होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावझी ४ वर्षे असून, या महामार्गावर २५ वर्षे पथकर म्हणजेच टोल असेल. या महामार्गा सुधावाडीजवळ बाह्य वर्तुळाकार मार्गाला जोडला जाणार आहे.

वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र बदल

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून हे काम केले जाणार आहे. याविषयी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर हा औद्योगिक पट्टा वेगाने विकसित होत आहे. या औद्योगिक पट्ट्यांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद रस्तेसंपर्क उपलब्ध करून देणारा हा महामार्ग वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्टे

  • तळेगाव ते चाकण – चौपदरी उन्नत महामार्ग
  • तळेगाव ते शिक्रापूर – चौपदरी महामार्ग
  • एकूण लांबी – ५३.२० किलोमीटर
  • एकूण खर्च – ५ हजार ९२३ कोटी रुपये