पिंपरी : औद्योगिक पट्ट्यातून जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव-चाकण चार पदरी मार्ग करण्यास मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिली आहे. हा मार्ग झाल्यास औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८-डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान चार पदरी उन्नत आणि चार पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये चार पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे.
पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
