पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील एका गृहनिर्माण संस्थेची लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह ११ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश सुरंगे असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे चेअरमनसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ दिनेश सुरंगे लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना लिफ्टचा रोप (दोरी) तुटल्याने लिफ्ट थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात दिनेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला सोसायटीच्या कमिटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

थेरगावात जुगार खेळवणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई

डांगे चौकाजवळ रस्त्याच्या कडेला ‘सोरट’ नावाचा जुगार खेळवत असलेल्या एका महिलेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (२८ मार्च) रोजी सकाळी दहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव खेमा वडेकर यांनी शनिवारी (२८ मार्च) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास डांगे चौकाकडून येणाऱ्या रस्त्यालगत आरोपी महिला लोकांकडून पैसे घेऊन सोरट जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

भांडणात मध्‍यस्‍थी करणाऱ्या भंगार विक्रेत्यावर चाकूने हल्ला

आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका भंगार विक्रेत्यावर चाकूने वार करून जखमी करण्‍यात आले. ही घटना रावेतमध्ये शुक्रवारी (२७ मार्च) दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महादेव दिलीप बिरादार (४५, शिंदे वस्ती, रावेत, मूळ रा. कर्नाटक) असे चाकू हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या भंगार विक्रेत्‍याचे नाव असून त्‍यांनी शनिवारी (२८ मार्च) रोजी याबाबत रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. अनिल हौसिलाल चव्हाण (२८, धर्मराज चौक, रावेत, मूळ रा. परभणी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास रावेत येथे फिर्यादीचे ओळखीचे अनिल चव्हाण आणि एका व्यक्तीमध्ये भांडण सुरू होते. बिरादार हे मध्यस्थी करण्यासाठी तिथे गेले असता, त्याचा राग मनात धरून आरोपी अनिल याने शिवीगाळ करत जवळ असलेल्या चाकूने बिरादार यांच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि मनगटावर वार केले. रावेत पोलीस ठाण्‍यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख याबाबत अधिक तपास करत आहेत.

जाब विचारल्याने वडिलांना लोखंडी कड्याने मारले

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि मुलाला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी कड्याने डोक्यात मारहाण करण्‍यात आली. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (२७ मार्च) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता, आरोपींनी पुन्हा वाद घातला. लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.