पुणे : क्रेन कोसळून वीज यंत्रणेचे नुकसान झाल्याने तळवडे परिसरातील ८ हजार ६१० ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी (२३ एप्रिल) खंडित झाला. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तळवडे परिसरातील जोतिबा मंदिरासमोरील महावितरणच्या रोहित्रावर (डीपी) क्रेन कोसळली. त्यामुळे ‘देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशन’ला वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिन्या तुटल्या आणि वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. उपकेंद्रातून जाणाऱ्या देहूगाव आणि तळवडे वीज वाहिन्यांचा पुरवठा खंडित झाला.
परिणामी तळवडे परिसरातील ८ हजार ६१० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यात ६ हजार ७०० घरगुती ग्राहकांसह १ हजार ९१० उद्योगांचा समावेश आहे. या घटनेमुळे उद्योगांना मोठा फटका बसला असून, अनेक लघु उद्योगांची उत्पादन साखळी विस्कळीत झाली. तर, ऐन उन्हाळ्यात वीज गेल्याने घरगुती ग्राहकांचे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले.
या प्रकरणी संबंधित क्रेन मालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून, वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. तुटलेले खांब बदलणे आणि नवीन तारा ओढण्याचे काम सुरू असून, सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येईल, असा दावाही महावितरणकडून करण्यात आला आहे.
पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्न
तळवडे आणि देहूगावचा हा पट्टा लघू आणि सूक्ष्म उद्योगांचा (MSME) कणा मानला जातो. येथे प्रामुख्याने ऑटोमोबाईल सुटे भाग आणि अचूक अभियांत्रिकी (Precision Engineering) क्षेत्रातील शेकडो लघु उद्योग कार्यरत आहेत. या कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रियेत विनव्यत्यव वीजपुरवठा गरजेचा असतो. गुरुवारी, सकाळी साडेअकरा वाजता म्हणजे, कामाच्या वेळेतच वीज खंडित झाल्याने ‘लेथ मशीन्स’, ‘ग्राइंडिंग’ आणि ‘वेल्डिंग’ युनिट्स पूर्णपणे ठप्प झाली.
याचा थेट परिणाम उत्पादनाच्या वेळेवर (Deadlines) झाला असून, अनेक वेळेत उत्पादन निर्मिती न होण्याच्या चिंता उद्योग प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात येत आहे. आयटी पार्क आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना याचा सर्वाधिक फटका बसला. या परिसरात आयटी पार्कमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागला.
औद्योगिक परिसरात अवजड वाहनांच्या वावरामुळे वीज यंत्रणेला होणारा धोका या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. औद्योगिक परिसरात अवजड वाहनांची वर्दळ वाढत असताना महावितरणच्या यंत्रणेला वारंवार अशा धडका बसत असल्याच्या तक्रारी उद्योग संघटनांकडून केल्या जात आहेत. वीज खांब आणि रोहित्र अशा संवेदनशील ठिकाणी संरक्षक कठडे किंवा अधिक सुरक्षा असावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि उद्योजकांकडून करण्यात येत आहे.
