पुणे : ताम्हिणी येथे एक जून ते एक जुलै या कालावधीत २,५१५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजीमध्येही यंदा जूनमध्ये इतका पाऊस झालेला नाही. तेथे जूनमध्ये सुमारे १ हजार मिलीमीटर पाऊस पडला.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, लोणावळा येथे १ हजार ३५० मिलीमीटर, तर मुळशी येथे १ हजार ३४६ मिलीमीटर पाऊस पडला असून, ही ठिकाणेही चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची ठरली आहेत. गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर कुरवंडे, लोणावळा, गिरीवन अशा काही ठिकाणी दिवसभरात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद अनेक वेळा झाली. तर ताम्हिणी येथे एका दिवसात ३०० मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस नोंदवला गेला होता.
यंदा मोसमी वारे २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाले. त्यानंतर अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने मोसमी वाऱ्यांनी झपाट्याने वाटचाल करून २६ मेपर्यंत पुणे, मुंबईपर्यंतचा प्रदेश व्यापला. त्यानंतर घाटमाथ्यावर सातत्याने पाऊस पडत आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम घाटाचा प्रदेश हा पावसाचा प्रदेश आहे. यंदा जूनमध्ये मोसमी वारे सक्रिय असल्याने पावसासाठी अनुकूल स्थिती होती. त्यामुळे जूनमध्ये पुण्याच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तर यंदा ईशान्य भारतात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तेथे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे जूनच्या पावसाच्या आकडेवारीत राज्यातील तीन ठिकाणांनी चेरापुंजीला मागे टाकलेले दिसते. चेरापुंजी येथे जून ते सप्टेंबर या पावसाच्या मोसमात सुमारे ११ हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो.
यंदाच्या जूनमध्ये सर्वाधिक पाऊस
यंदा जूनमध्ये शिवाजीनगर येथे २६७.५ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. हवामान विभागाच्या २०१४पासूनच्या आकडेवारीनुसार जूनमध्ये पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या पूर्वी २०१५मध्ये २११.२ मिलीमीटर, २०१९मध्ये २०७.७ मिलीमीटर, तर २०२४मध्ये २५२ मिलीमीटर पाऊस पडला होता. जूनमध्ये पुण्यात सरासरी १५२.९ मिलीमीटर पाऊस पडतो.