पुणे : वकिली करताना आलेले अनुभव आणि दृष्टिहीन असूनही सहकाऱ्यांनी दिलेली प्रेरणा, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर मिळवलेले यश या बाबत देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश तान्या नाथन सी. यांनी बुधवारी त्यांचे प्रेरणादायी अनुभव सांगितले.
‘दीपस्तंभ फाउंडेशन’च्या वतीने तान्या नाथन सी. यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, अपंग कल्याण आयुक्त सत्यजित बढे, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. के. जैन, फाउंडेशनचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन या वेळी उपस्थित होते. नाथन यांच्याशी मिलिंद पाटील यांनी संवाद साधला.
नाथन म्हणाल्या, ‘केरळमधील कन्नूरमध्ये शिक्षण झाले. आई-वडील, दोन बहिणी असे आमचे चौकोनी कुटुंब. विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वकिली करण्यास सुरुवात केली. दृष्टिहीन असल्यामुळे अन्य वकिलांकडून सहकार्य मिळणार नाही, असे वाटत होते. मात्र, सर्व सहकाऱ्यांनी मला प्रोत्साहित केले.
ज्येष्ठ वकील सुनीलकुमार यांनी मला कायम मार्गदर्शन केले. वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशपदासाठी अपंग उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाची परीक्षा देण्याचे निश्चित केले. दृष्टिहीन उमेदवारांसाठी मार्गदर्शनपर विधीविषयक पुस्तकांची उपलब्धता, तसेच नव्याने झालेले कायदेबदल याचाही सखोल अभ्यास केला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे साध्य केले.’
‘२०११ मधील जनगणनेनुसार आपल्या देशात दोन कोटी ७८ लाख अपंग असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी फक्त २२ टक्के अपंगांना विविध योजनांचा लाभ मिळतो. उर्वरित अपंगांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या अनेक योजनांपासून अपंग उमेदवार, विद्यार्थी वंचित राहतात. ही खूप मोठी तफावत आहे. देशभरातील अपंग विद्यार्थी, उमेदवारांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ होणे गरजेचे आहे,’ असे बढे यांनी नमूद केले. महेंद्र महाजन, जैन, जाधव तसेच यजुवेंद्र महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

