पुणे : आधी झालेल्या गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे गुंतागुंत होऊन टांझानियातील रुग्णाला चालण्यास त्रास होऊ लागला. त्याचे चालणे बंद झाल्याने अखेर त्याला पुण्यात उपचारासाठी आणण्यात आले. त्यातच या रुग्णाला गंभीर हृदयविकार होता. डॉक्टरांनी या रुग्णाच्या मांडीच्या पूर्ण हाडाचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या केले. यामुळे हा रुग्ण पुन्हा चालू लागला आहे. टांझानियातील या रुग्णावर आधी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यात मांडीच्या हाडाच्या जागी दुसरे इम्प्लान्ट बसविण्यात आले होते. यामुळे कालांतराने इतर हाडांना गंभीर दुखापत झाली. या गुंतागुंतीच्या स्थितीमुळे रुग्णाला चालताना तीव्र वेदना होऊ लागल्या. हळूहळू त्याचे चालणेही बंद झाले. त्यातच त्याला गंभीर हृदयरोग असल्याने त्याच्यावरील उपचार आव्हानात्मक बनले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले. त्याला डेक्कनमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ डॉ अभिजित आगाशे म्हणाले की, या रुग्णाला आमच्याकडे आणले त्यावेळी त्याचे जुने इम्प्लान्ट सैल होऊन आजूबाजूच्या मांडीच्या हाडाचे ६० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले होते. रुग्णाच्या सीटी स्कॅन तपासणीत हाडाचा बराचसा भाग खराब झाल्याचे आढळले. त्यामुळे संपूर्ण मांडीचे हाड प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दुर्मीळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकारासारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया फारच कमी वेळा केली जाते.

या रुग्णाच्या हृदयाचे कार्य खूपच मंदावलेले होते. या रुग्णाला पूर्ण भूल देऊन एवढी मोठी शस्त्रक्रिया करणे खूप जोखमीचे होते. अचूक नियोजन, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान आणि आधुनिक भूल पद्धती यामुळे ही प्रक्रिया सुरक्षितपणे करता आली. शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीचे २-३ दिवस रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवून त्याचे हृदय स्थिर राहील याची काळजी घेण्यात आली. रुग्णाची तब्येत सुधारू लागल्यानंतर सुरुवातीला बसणे, मग उभे राहणे, आधार घेऊन पावले टाकणे अशा क्रियांमध्ये त्याला मदत करण्यात आली. आज हा रुग्ण हातात काठी घेऊन चालू शकत आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, असेही डॉ. आगाशे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रक्रिया कशा पद्धतीने?

या प्रक्रियेत रुग्णाच्या मांडीचे पूर्ण हाड खुब्यापासून गुडघ्यापर्यंत काढून त्याऐवजी एक धातूचा इम्प्लान्ट बसवला जातो. या इम्प्लान्टमध्ये एक कृत्रिम खुब्याचा सांधा आणि हालचाल करता येणारा गुडघ्याचा सांधा बसवलेला असतो. रुग्णाला पूर्ण भूल देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया साधारण सात तास चालते. मांडीवर छेद देऊन खराब झालेले हाड काढले जाते आणि त्याजागी नवीन कृत्रिम सांधा बसवला जातो. हाडांची हालचाल सुरळीत व्हावी यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि स्नायूबंध पुन्हा जोडले जातात.