पुणे : मराठी भाषेला साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार मिळवून देणार्‍या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाचे ओडिया भाषेत भाषांतर झाले आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीळकंठ रथ यांनी हे शिवधनुष्य पेलले असून भुवनेश्वर येथील शिक्षासंधान प्रकाशन संस्थेने ‘वैदिक संस्कृतीर बिकाश’ शीर्षकाने ते प्रकाशित केले आहे.  

डॉ. रथ म्हणाले, ‘‘वयाच्या २० व्या वर्षापासून पुण्यात वास्तव्यास असल्यामुळे ओडिया प्रकाशनांशी माझी ओळख मर्यादित आहे. मी काही ओडिया दैनिक वर्तमानपत्रे, काही मासिके आणि पुस्तके नियमित वाचतो. विविध लेख वाचून बहुतेक लेखक पारंपरिक धार्मिक श्रद्धाळू लोक आहेत, असे वाटते.

वर्तमानपत्रांमध्ये लिहिणारे विद्यापीठातील अनेक शिक्षक प्राचीन संस्कृत साहित्याशी परिचित आहेत. परंतु, त्यापैकी बहुतेकांचा वैदिक साहित्याशी परिचय मर्यादित असल्याचे दिसून येते. म्हणून, संपूर्ण वैदिक साहित्य, त्यांतील मूलभूत सूत्रे आणि कालानुक्रमे घडलेल्या घडामोडींबद्दल माहिती देणारे हे पुस्तक भाषांतरित करणे उपयुक्त ठरेल, असे मला वाटले. भाषांतर हाती घेण्याचे हेच माझे प्रमुख कारण आहे.’’

हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नडमध्ये भाषांतर

‘वैदिक संस्कृतीचा विकास’ हा तर्कतीर्थांचा ग्रंथ मराठी भाषेतील अभिजात ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठात दिलेल्या सहा व्याख्यानांवर आधारित होता. या व्याख्यानांमध्ये तर्कतीर्थांनी वैदिक संस्कृतीच्या उत्क्रांतीचा आणि आधुनिक भारतावरील त्याच्या प्रभावाचा मागोवा घेतला होता. या ग्रंथाची आतापर्यंत हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये भाषांतरे झाली आहेत. या ग्रंथाचे कन्नड भाषांतरही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

ओडिया भाषेतील ग्रंथाची पृष्ठसंख्या ५६० आहे. या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ लवकरच पुण्यात होणार आहे. तर्कतीर्थांचे हे पुस्तक वाचकाला विचार करायला लावेल. त्याचे मन उच्च पातळीच्या विचाराकडे नेईल. परिणामी लोकांना कुठल्या तरी एका विशिष्ट विचारसरणीच्या किंवा रूढीच्या सध्याच्या अविचारी अनुकरणापासून दूर नेईल. – डॉ. नीळकंठ रथ, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ