पुणे : टाटा समूहातील आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने जागतिक पातळीवर मोठे पाऊल टाकले आहे. टाटा ऑटोकॉम्पने आपल्या ब्रिटनमधील उपकंपनीच्या माध्यमातून स्वीडनमधील कंपनी ताब्यात घेतली आहे. यामुळे कंपनीचा ब्रिटनसह युरोपमध्ये व्यवसाय विस्तार झालेला आहे. यातून तेथील बाजारपेठांमध्ये कंपनीचे स्थान आणखी बळकट झाले आहे.
टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स लिमिटेडने आपली ब्रिटीश उपकंपनी आर्टिफेक्स इंटिरियर सिस्टीम्सच्या माध्यमातून आयएसी ग्रुप स्लोव्हाकिया एसआरओची शंभर टक्के समभाग भांडवल खरेदी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या धोरणात्मक अधिग्रहणामुळे टाटा ऑटोकॉम्पच्या क्षमतांना अधिक बळ मिळणार असून ब्रिटन तसेच युरोपीय समुदायातील बाजारपेठांमध्ये विस्तारासाठी मजबूत पाया तयार होणार आहे. यामुळे कंपनीच्या विकास योजनांना गती मिळेल. तसेच जागतिक वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी पसंतीचा भागीदार बनण्याच्या आमच्या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे. या माध्यमातून कंपनी युरोपमधील वाहन निर्मिती क्षेत्रात आपले स्थान अधिक बळकट करणार आहे.
यावेळी अरविंद गोयल म्हणाले की आर्टिफेक्स सिस्टीम्स स्लोव्हाकिया एसआरओचे (पूर्वीची आयएसी स्लोव्हाकिया) एकत्रीकरण यशस्वीरीत्या पूर्ण होणे हे आर्टिफेक्स ब्रँडच्या बळकटीकरणासाठी तसेच जागतिक विकास धोरणासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. स्वीडन, ब्रिटन आणि स्लोव्हाकिया येथे कार्यरत आर्टिफेक्स सिस्टीम्स एबी, आर्टिफेक्स इंटीरियर सिस्टीम्स तसेच आर्टिफेक्स सिस्टीम्स यांना एकसंध ओळखीखाली आणून ब्रँड अधिक मजबूत करण्यात येणार आहे.
याबाबत टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोल्हटकर म्हणाले की, युरोपामधील आमच्या व्यवसायात कार्यप्रणाली तसेच सांस्कृतिक समन्वय भक्कम आहे. हे एकत्रीकरण वाहन निर्मिती क्षेत्रातील आमच्या ग्राहकांसाठी जलद निर्णय प्रक्रिया, अधिक प्रभावी अंमलबजावणी तसेच मूल्यनिर्मितीला चालना देणारे ठरणार आहे.
स्वीडन अभियांत्रिकी केंद्राचे उद्घाटन
आर्टिफेक्सने गोथेनबर्ग येथे आपल्या स्वीडन अभियांत्रिकी केंद्राचे उद्घाटन केले आहे. या केंद्राचे उद्घाटन टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल यांच्या हस्ते झाले. हे केंद्र युरोपमध्ये आर्टिफेक्सच्या अभियांत्रिकी तसेच नवोन्मेष क्षमतांना बळकटी देणार असून प्रादेशिक ग्राहक आणि भागीदारांशी सहकार्य वाढविण्यास मदत करणार आहे. जागतिक पातळीवरील आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांना इंटिरियर व एक्स्टिरियर सिस्टीम्सचा पुरवठा आर्टिफिक्सकडून होतो. कंपनीचा वार्षिक महसूल १.३ अब्ज डॉलर असून एकूण मनुष्यबळ ४१०० आहे.
