पुणे : टाटा मोटर्स, फोर्स मोटर्स, ह्युंदाई मोटर्स, कमिन्स इंडिया यासह इतर मोठ्या कंपन्यात थेट नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. हा रोजगार मेळावा नवी सांगवीतील समर्थ नगरमध्ये न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, येथे १४ मे रोजी होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपळे गुरव यांच्या वतीने गुरुवारी १४ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. मेळाव्यात टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लि., कमिन्स इंडिया लि., फोर्स मोटर्स लि., हुंदाई मोटर्स इंडिया लि. यासह पुणे जिल्ह्यातील विविध मोठ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी, पदवी तसेच पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठी विविध रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. जिल्ह्यातील कंपन्या त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांची नोंदणी करतात. त्यानुसार या कंपन्यांशी समन्वय साधून रोजगार मेळावा आयोजित केला जातो. या माध्यमातून बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळते.

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांच्या माहितीसाठी व ऑनलाइन अर्जासाठी http://www.rojgar.mahaswayam.gov.in महा स्वयंरोजगार संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मेळाव्यास उपस्थित राहताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो व Resume च्या किमान १० प्रती सोबत आणाव्यात.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

पाच हजार जागा

पिंपरी-चिंचवड शहरातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असलेल्या या मेळाव्यात पाच हजारांपेक्षा अधिक पदांसाठी निवड प्रक्रिया होणार आहे. जास्तीतजास्त युवक-युवतींनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी केले आहे.