पिंपरी : विवाह संकेतस्थळावर खोटे प्रोफाइल तयार करून एका महिलेकडून ४२ लाख ६४ हजार ३२ रुपये घेतले. सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केल्‍यावर महिलेला काही रक्‍कम परत मिळाली. मात्र चोरट्याने २७ लाखांची फसवणूक केली. ही घटना ताथवडे येथे २७ नोव्‍हेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ रोजी घडली. याबाबत पिडित महिलेने वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खोट्या नावाने विवाह जुळविणाऱ्या संकेतस्‍थळावर आपली नाव नोंदणी केली होती. त्‍याने पिडित महिलेशी ऑनलाइन संपर्क करून आपण स्वतः इस्रोमध्ये वैज्ञानिक असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच पिडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने तिच्‍याकडून वेगवेगळी कारणे सांगत ४२ लाख ६४ हजार ३२ रूपये घेतले. मात्र आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच त्‍या महिलेने सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. त्‍यामुळे आरोपीने उकळलेली १६ लाख ६४ हजार ३२ रुपयांची रक्‍कम तिला परत मिळाली. मात्र आरोपीने २७ लाख रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

लिंक ओपन करताच पावणे दोन लाख रुपये लंपास

बनावट ट्रॅफिक दंडाचा मेसेज पाठवून एका नागरिकाची एक लाख ८६ हजार ४४२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ जानेवारी २०२६ रोजी उघडकीस आला आहे.

 याप्रकरणी लिंक पाठविणाऱ्या अज्ञात सायबर चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. याबाबत पिंपळे निलख येथील एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी फिर्यादीच्या मोबाइलवर ‘ट्रॅफिक फाईन’ संदर्भात मेसेज आला. लिंक उघडून ५०० रुपये भरण्याचा प्रयत्न करताच फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ८६ हजार रुपये काढून घेण्‍यात आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

फुकटचा केक घेण्‍यासाठी टोळक्‍याची दहशत

केकचे पैसे मागितल्याच्या रागातून दुकानात दहशत माजवत दोन हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच कोयत्‍याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. याप्रकरणी तीन जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील एका बेकरीत घडली.

आदित्य मानवतकर याला पोलिसांनी अटक केली आहे. नौशाद मुख्तार अहमद (४२,जगताप नगर, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्‍वा अकरा वाजताच्‍या सुमारास तीनही आरोपी फिर्यादी यांच्‍या बेकरीत आहे. आरोपींनी केक घेऊन पैसे न देता निघण्याचा प्रयत्न केला. पैसे मागितल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या शर्टाच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. तसेच कोयता दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून धारदार कोयता बाळगून संशयास्पदरीत्या थांबलेल्या गुंडाला पोलीसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरीतील एच.ए. ग्राऊंड परिसरात करण्यात आली.

पवन सचिन ससाणे (२१, सुमेत बुद्ध विहाराजवळ, गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्‍या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भुरे यांनी याबाबत संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन ससाणे याला १७ ऑक्‍टोबर २०२५ रोजी संपूर्ण पुणे जिल्‍ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले होते. मात्र शासनाची कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला. तसेच कोणतातरी गुन्‍हा करण्‍यासाठी त्‍याने आपल्‍याजवळ ३०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता बाळगला होता. पोलिसांनी एच ए ग्राऊंड परिसरातून त्‍याला कोयत्‍यासह ताब्‍यात घेतले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

किरकोळ कारणावरून दोघांवर हल्ला; तिघांना अटक

किरकोळ कारणावरून दोन तरुणांवर हल्ला करून जखमी करण्‍यात आले. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्‍यात आली आहे. तसेच आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना एमआयडीसी भोसरीत घडली.

प्रेम नवनाथ जाधव (१९), स्वप्नील विलास खुने (१९) व अमिष बापू सरोदे (१९) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. त्याच्यासह एकावरही गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. अभिजीत तुकाराम तळपे (२३, सज्‍जनगड, एमआयडीसी भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी अभिजित तळपे आणि त्‍याचा मित्र हे दोघेजण गप्‍पा मारत उभे होते. त्‍यावेळी ‘फिर्यादीकडे बघून का हसता’ या कारणावरून आरोपींनी मातीच्या पनत्या फेकून मारत दोघांनाही जखमी केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.