पिंपरी : महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाच्या शनिवारी झालेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सहभाग घेतला. मालमत्ताकरावरील सवलती, ‘मालमत्ता सर्वेक्षण अभियान’, युपिक आयडी (युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड) आणि मालमत्ताकरविषयक शंकांचे निरसन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्यामार्फत करण्यात आले.
नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये थेट संवाद असा उद्देश ठेवून करसंवाद घेण्यात येतो. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरविली. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेशही देण्यात आले. करसंवादामध्ये शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. चालू आर्थिक वर्षात तीन लाख मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत ५७० कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. सप्टेंबरअखेर ऑनलाइन स्वरूपात मालमत्ताकर भरल्यास सामान्यकरामध्ये चार टक्के, नवीन आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी तीन महिन्यांमध्ये आगाऊ कराचा भरणा केल्यास सामान्य करामध्ये १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहनही करसंवादामधून करण्यात आले.




हेही वाचा >>>…म्हणून गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर होतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा
महापालिका हद्दीमध्ये सहा लाख नोंदणीकृत मालमत्ता आहेत. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने ‘मालमत्ता सर्वेक्षण अभियान’ सुरू करण्यात येणार असून, याद्वारे मालमत्तांची संपूर्ण माहिती जमा केली जाणार आहे. या अभियानामार्फत अत्याधुनिक नकाशे प्रणालीद्वारे गटाची निर्मिती करून मालमत्तांना विशिष्ट मालमत्ता क्रमांक देण्यात येणार आहे. त्याबाबतच्या मालमत्ताधारकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.
हेही वाचा >>>VIDEO: गोष्ट पुण्याची-९९ : मुघलांचे आक्रमण ते तुकोबांच्या किर्तनांचं साक्षीदार असलेलं प्राचीन ‘नागेश्वर मंदिर’
महिलांना रोजगार
करसंकलन विभागाने मालमत्ताकर देयके वितरणाचे काम महिला बचत गटांना दिले होते. त्यांच्या माध्यमातून शंभर टक्के देयकांचे वाटप करण्यात आले. त्याच धर्तीवर ‘मालमत्ता सर्वेक्षण नोंदणी’ अभियानासाठी माहिती संकलित करण्याचे काम बचत गटांच्या महिलांना देण्यात आले असून, यातून त्यांना रोजगार मिळणार आहे