पुणे : कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील स्वयंचलित उत्पादन प्रकल्पांचे पाऊल पडण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) कंपनीने देशातील पहिली निर्मिती क्षेत्रातील ‘एआय’ प्रयोगशाळा पुण्यात सुरू केली आहे. डिजिटल ट्वीन्स, औद्योगिक एआय, रोबोटिक्स यांसह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती प्रकल्प कमीत कमी मानवी हस्तक्षेपांसह चालवण्याबाबत या प्रयोगशाळेत संशोधन केले जाणार आहे. त्याचा वापर पुढे प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रात होणार आहे.

‘पुण्यातील या प्रयोगशाळेत स्वयंचलित निर्मिती प्रकल्पाचे विविध टप्प्यांतील प्रारूप तयार केले जाणार आहे. या प्रारुपामुळे निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले आराखडे बनविणे, त्यांचे प्रमाणीकरण करणे आणि प्रत्यक्ष उत्पादन यंत्रणेसाठी त्यांचा वापर अशा गोष्टींसाठी मदत होणार आहे. उद्योग ४.० म्हणजेच चौथ्या औद्योगिक क्रांतिकडे वाटचाल करताना ‘एआय’ आणि रोबोटिक्समधील संकल्पना प्रत्यक्ष स्वरूपात आणल्या जात आहेत. या संकल्पनांच्या माध्यमातून अत्याधुनिक निर्मिती प्रकल्प कसा असावा, याच्या शक्यता पडताळून पाहण्यासोबत आराखडा तयार करून अंतिम प्रक्रियेतील धोके कमी करण्याबाबत ही प्रयोगशाळा काम करणार आहे,’ असे ‘टीसीएस’ने म्हटले आहे.

या बाबत ‘टीसीएस’चे उपाध्यक्ष श्रीनिवास चक्रवर्ती म्हणाले, ‘आपण निर्मिती प्रकल्पाचा विचार करतो, त्या वेळी मोठे कारखाने, अवजड उपकरणे आणि त्यासाठी लागणारे मानवी परिश्रम हे चित्र डोळ्यासमोर येते. आता भविष्यातील निर्मिती प्रकल्प उभारण्याची वेळ आली आहे. आम्ही या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अभियांत्रिकी ‘एआय’ आधारित अत्याधुनिक उत्पादन यंत्रणा उभारण्यास मदत करणार आहोत. भविष्यात डिजिटल प्रक्रियेने चालणाऱ्या स्वयंचलित उत्पादन यंत्रणेच्या दिशेने आता मानव आणि ‘एआय’ एकत्रितरीत्या पाऊल टाकत आहेत.’

प्रयोगशाळेची वैशिष्टे

  • स्वयंचलित कारखाने संकल्पना : ‘एआय’ आधारित उत्पादन सुधारणा, देखभाल पूर्वसूचना, गुणवत्ता तपासणी आणि लवचिक कार्यपद्धती यांचा समावेश.
  • डिजिटल ट्वीन अँड सिम्युलेशन : आभासी प्रारूपे आणि चाचण्यांच्या मदतीने कारखान्यात यंत्रणा बसविण्याआधी तिची यशस्वीपणे तपासणी शक्य.
  • व्हिजन एआय, रोबोटिक्स : उत्पादन यंत्रणेला पाठबळ देण्यासाठी स्वीकारार्ह अशी कार्यपद्धती आणि मानव-यंत्र भागीदारीवर भर.
  • सेन्सर-टू-क्लाऊड इंडस्ट्रियल इंटेलिजन्स – कारखान्यातील प्रक्रियेत सेन्सरसोबत एज आणि क्लाऊड मंचांचा वापर करून त्यातील निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान.
  • सॉफ्टवेअर आधारित अभियांत्रिकी : अभियांत्रिकी क्षमतांच्या सहाय्याने औद्योगिक प्रकल्पांतील यंत्रणांमधील सुधारणा करण्यासाठी सॉफ्टवेअर, विदा आणि ‘एआय’ आधारित ऑटोमेशनचा वापर.