TCS Email to Employees: देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे गदारोळ उडाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून काही कर्मचाऱ्यांना अटकही केली आहे. या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेत कंपनीच्या व्यवस्थापनाने आता थेट कर्मचाऱ्यांशी ई-मेलद्वारे संवाद साधला आहे. कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून याबाबतच्या तातडीच्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांबाबतही कंपनीने सूतोवाच केले आहे.
टीसीएसने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, गेले काही दिवस नाशिकमधील आपल्या कार्यालयात घडत असलेल्या घटना सर्वांना माहितीच आहेत. कार्यालयाच्या ठिकाणी आणि बाहेर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता जपण्यास कंपनी व्यवस्थापन सर्वोच्च प्राधान्य देते. कोणतेही गैरप्रकार खपवून न घेण्याचे टीसीएसचे धोरण आहे. त्यामुळे कंपनीने या प्रकरणी आत्तापर्यंत कोणती पावले उचलली याबद्दल तुम्हाला माहिती देत आहोत.
या प्रकरणाची माहिती मिळताच व्यवस्थापनाने तातडीने पावले उचलली आणि चौकशी सुरू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. स्थानिक तपास यंत्रणांकडून या प्रकरणी तपास सुरू असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यांच्या तपासात समोर येणाऱ्या गोष्टींवर कंपनी व्यवस्थापन अंतिम निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करेल. व्यवस्थापन या प्रकरणात निर्णायक पावले उचलत असताना कर्मचाऱ्यांनी ही काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबतची समाज माध्यमे आणि बाह्य स्रोतांमधील माहिती अफवा पसरणारी दिशाभूल करणारी असू शकते त्यामुळे त्यापासून कर्मचाऱ्यांनी दूर राहावे.
त्रुटी असल्यास माहिती द्या
लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबतचे आपले धोरण योग्य पद्धतीने राबवले जात आहे. यासंबंधीच्या तक्रारी आल्यास त्यांची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाते. या कार्यपद्धती कर्मचाऱ्यांना काही त्रुटी आढळून येत असल्यास त्यांनी तातडीने याची माहिती व्यवस्थापनाला द्यावी. या तक्रारींची दखल एथिक्स कन्सर्न पोर्टलच्या माध्यमातून घेतली जाईल. कार्यालयीन ठिकाणी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे कल्याण याबद्दल कंपनी कटिबद्ध आहे यात तुम्हा सर्वांची सहकार्य यापुढेही असेच राहील अशी आशा आहे, असे व्यवस्थापनाने नमूद केले आहे.
कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
नाशिकमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, टीसीएसमधील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचे परीक्षण केले जावे, अशी मागणी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संघटना ‘नाइट्स’ने केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे केली आहे. देशभरात आयटी आणि आयटीसंलग्न सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील या कायद्याच्या अंमलबजावणीचे राज्यस्तरीय पातळीवर लेखापरीक्षण करावे आणि त्यात महाराष्ट्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्राधान्याने समावेश करावा, असेही संघटनेने म्हटले आहे.
