पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याप्रकरणी कंपनीतील काही अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. टीसीएसच्या नाशिक केंद्रात या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता टीसीएसने नाशिक केंद्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
टीसीएसचे नाशिक केंद्र गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. याप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन टीसीएसने आता सर्वांनाच वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न?
याप्रकरणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेने आक्षेप नोंदवला आहे. फोरमने म्हटले आहे की, टीसीएसने नाशिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम देण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. टीसीएसमधील गैरप्रकारांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत असताना हा निर्णय घेण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरेच हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आला आहे का, की कर्मचाऱ्यांना गप्प करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे? कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे का?
लैंगिक छळाच्या तक्रारींत पाचपट वाढ
टीसीएसमध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या काळात लैंगिक छळाच्या तक्रारींत पाचपट वाढ झाली. कंपनीने वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. ‘टीसीएस’च्या एकूण महिला कर्मचाऱ्यांपैकी लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण २०२३-२४ मध्ये ०.०५ टक्के होते. ते २०२४-२५ मध्ये ०.०६ टक्क्यांवर पोहोचल्याचे वार्षिक अहवालात दिसते आहे.
प्रत्येक कंपनीला कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा (प्रतिबंध, मनाई व निवारण) २०१३ नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी लागते. महिला कर्मचारी या समितीकडे तक्रार दाखल करतात. या तक्रारींची माहिती कंपनीकडून वार्षिक लेखापरीक्षण अहवालात देण्यात येते. ‘टीसीएस’नेही या तक्रारींची माहिती आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे. दरम्यान, याबाबत ‘टीसीएस’शी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
