पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या काळात लैंगिक छळाच्या तक्रारींत पाचपट वाढ झाली. कंपनीने वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.
कंपनीच्या नाशिकमधील शाखेतील लैंगिक छळांचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर, कंपनीने वार्षिक अहवालात दिलेल्या माहितीचे अवलोकन केले असता, गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत लैंगिक छळाच्या तक्रारींची संख्या पाचपट वाढलेली दिसते. ‘टीसीएस’च्या एकूण महिला कर्मचाऱ्यांपैकी लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण २०२३-२४ मध्ये ०.०५ टक्के होते. ते २०२४-२५ मध्ये ०.०६ टक्क्यांवर पोहोचल्याचे वार्षिक अहवालात दिसते आहे.
प्रत्येक कंपनीला कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा (प्रतिबंध, मनाई व निवारण) २०१३ नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी लागते. महिला कर्मचारी या समितीकडे तक्रार दाखल करतात. या तक्रारींची माहिती कंपनीकडून वार्षिक लेखापरीक्षण अहवालात देण्यात येते. ‘टीसीएस’नेही या तक्रारींची माहिती आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे. दरम्यान, याबाबत ‘टीसीएस’शी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
केंद्रीय कामगार मंत्र्यांकडून दखल
‘टीसीएसमधील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल केंद्रीय कामगार मंत्र्यांनी घेतली आहे. याप्रकरणी मुख्य कामगार आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी कार्यवाही करावी आणि त्याबाबत अहवाल सादर करावा, अशाही सूचनाही देण्यात आल्या आहेत. ‘टीसीएस’च्या नाशिक केंद्रातील घटना या केवळ अपवाद नसून, अशा प्रकारच्या घटना आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांत मोठ्या प्रमाणात घडत आहेत,’ अशी माहिती नॅसंट इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटचे (नाइट्स) अध्यक्ष हरप्रीतसिंग सलुजा यांनी दिली.
कंपनीवर कारवाई होऊ शकते
प्रत्येक कंपनीला कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा (प्रतिबंध, मनाई व निवारण) यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी लागते. या समितीची स्थापना, तिचे अध्यक्ष व सदस्य, या समितीकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेली कार्यवाही या सर्व बाबींची माहिती कंपनीला दर वर्षी जिल्हाधिकारी, महिला व बालकल्याण विभाग आणि कामगार विभागाला द्यावी लागते. याचे उल्लंघन केल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी सांगितले.
‘टीसीएस’मधील तक्रारींची वर्षनिहाय संख्या
२०२०-२१ : २७
२०२१-२२ : ३६
२०२२-२३ : ४९
२०२३-२४ : ११०
२०२४-२५ : १२५
