scorecardresearch

खाऊखुशाल : थंडी आणि वाफाळता..

पुण्यात असा वाफाळता चहा घ्यायचा तर चौकाचौकात असलेल्या ‘अमृततुल्यं’ना पर्याय नाही.

खाऊखुशाल : थंडी आणि वाफाळता..

 

दिवस थंडीचे आहेत. थंडीत ज्या अनेक गोष्टींना महत्त्व असतं, त्यात माझ्या मते वाफाळत्या चहाचं महत्त्व सर्वाधिक आहे. पुण्यात असा वाफाळता चहा घ्यायचा तर चौकाचौकात असलेल्या ‘अमृततुल्यं’ना पर्याय नाही. पुण्याच्या खाद्य संस्कृतीची जी अनेक वैशिष्टय़ं आहेत, खाद्य संस्कृतीचं जे वेगळेपण आहे, त्यात अमृततुल्य हॉटेलांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

एकदा नारायण पेठेत असलेल्या श्री नागनाथ अमृततुल्यचे मालक कुंदनशेठ दवे यांच्याशी गप्पा मारत असताना अमृततुल्य हॉटेलांचा सगळा इतिहासच त्यांनी उलगडून दाखवला. ते गेली चाळीस-बेचाळीस वर्ष या व्यवसायात आहेत. त्यांच्या बरोबर झालेल्या गप्पांमध्ये समजलं, की पुण्यातली ही अमृततुल्य हॉटेल राजस्थानातून आलेल्या मंडळींनी सुरू केली आहेत.

विश्वनाथ पन्नालाल नर्तेकर हे पुण्यातल्या अमृततुल्यचे संस्थापक. त्यांनी सन १९२६ मध्ये रामेश्वर चौकात अमृततुल्य हॉटेल सुरू केलं. हे पुण्यातलं पहिलं अमृततुल्य. पुढे या हॉटेलचं स्थलांतर झालं आणि ते सोन्या मारुती चौकात गेलं. आजही त्याच ठिकाणी ते ‘आद्य अमृततुल्य’ या नावानं सुरू आहे. अमृततुल्य हॉटेलांच्या सुमारे नव्वद वर्षांच्या इतिहासाची ही ओळख आहे. राजस्थानातील जालोर जिल्ह्य़ातल्या नर्ता या गावचे रहिवासी असलेल्या नर्तेकर यांचा मूळचा व्यवसाय पूजापाठ, लग्न-मुंज आदी धार्मिक कार्यक्रम करण्याचा. हा श्रीमाळी ब्राह्मण समाज. पौरोहित्य हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. सन १९०० च्या आसपास राजस्थानातील दुष्काळामुळे श्रीमाळी समाजातील दवे, ओझा, जोशी, त्रिवेदी, ठाकूर आदी कुटुंब पुण्या-मुंबईत आली आणि या मंडळींनी चहाचा व्यवसाय निवडला. कमी भांडवलाचा असल्यामुळे अनेक जण याच व्यवसायात आले. एकमेकांना आधार देत त्यांनी पुण्यात अमृततुल्य सुरू केली आणि अमृततुल्यंची संख्या चारशे-साडेचारशेच्या आसपास गेली. पुण्यात पहिलं अमृततुल्य सुरू झालं त्या वेळी चहा मिळायचा एक पैशांना. सर्वसाधारणपणे आज पुण्यात अमृततुल्य हॉटेलांमध्ये दहा रुपयांना चहा मिळतो, शिवाय कटिंग चहा सात किंवा आठ रुपयांना मिळतो. पूर्वी कप-बशीत दिला जाणारा चहा आता या हॉटेलांमध्ये मुख्यत: काचेच्या ग्लासमध्ये दिला जातो, पूर्वी पाण्यासाठी टेबलवर स्टिलचे ग्लास असत. त्यांची जागा आता पाण्याच्या बाटल्यांनी घेतली आहे, असे काही बदल सोडले तर वर्षांनुवर्ष ही अमृततुल्य जशी होती तशाच पद्धतीनं चालवली जात आहेत.

पुण्यातही ही सगळी अमृततुल्यं एकसारखी वाटत असली, तरी ती एकसारखी नाहीत, हे तिथे गेल्याशिवाय समजणार नाही. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चहाचं काही ना काही वेगळेपण आहे. मग ते शनिपार चौकातलं अंबिका असो किंवा नारायण पेठेतलं नागनाथ असो, नाहीतर इतर कुठलंही हॉटेल असो. चहा तयार करण्याची सगळीकडची पद्धत तशी सारखीच; पण तरीही चवीचं वेगळेपण आणि वैशिष्टय़ं वर्षांनुवर्ष जपलेलं आहे, असा अनुभव इथे येतो. हॉटेलसाठीची छोटी जागा, अ‍ॅल्युमिनियम आणि स्टीलमध्ये किंवा कडप्पा वापरून तयार केलेली मांडणी, मोठी शेगडी, दुधाची आणि चहाची पातेली, स्टीलच्या िपपामध्ये भरलेली साखर, वेलची कुटण्यासाठी पितळेचा छोटा खल आणि बत्ता, हिशेब मांडून ठेवण्यासाठी दगडी पाटी, गल्ल्यामध्ये खातेदारांच्या छोटय़ा छोटय़ा डायऱ्या, ट्रे, काचेचे ग्लास, काही कपबशा आणि पितळी किटली या गोष्टी तुम्हाला प्रत्येक अमृततुल्यमध्ये बघायला मिळतील. आधण उकळत असताना त्यात नेमक्या अंदाजानं आधी साखर, मग चहाची पावडर, नंतर दूध आणि सर्वात शेवटी कुटलेली वेलची किंवा आलं नाहीतर चहाचा मसाला घालणं, हे सगळं करताना हातातल्या ओघराळ्यानं चहा ढवळत राहणं आणि मधेच तयार होत आलेल्या चहाचे एक-दोन थेंब ओघराळ्यातून डाव्या हातावर घेऊन चव बघणं.. हे सगळं मोठं कौशल्याचं काम. गल्ल्यावर बसलेले मालक लयबद्धरीतीनं हे काम करत असतात.

खूप चकचकीत वा ‘पॉश’ नाहीत, ग्राहकांना आकर्षित करेल असा कोणताही ‘शो’ नाही अशी ही अमृततुल्यं. तरीही चहाप्रेमी अमृततुल्यंचे खरेखुरे चाहते त्यामुळेच चहा प्यायचा म्हटलं की त्यांची पावलं अमृततुल्यकडेच वळतात. भले चहा तयार व्हायला कितीही वेळ लागणार असला आणि तिथे गर्दीही खूप असली, तरी चहा इथलाच हवा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2016 at 03:21 IST

संबंधित बातम्या