सिंहगड रस्त्यावरील शाळेतील क्रीडा शिक्षकाकडून लैंगिक शोषण घडल्याच्या प्रकाराच्या पाश्र्वभूमीवर संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची सूचना दिली असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी सांगितले. यापूर्वी पुण्यात वारजे, वानवडी येथील शाळांमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यात दिरंगाई झाल्याची कबुली देत माने यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
पुण्यात गेल्या वर्षभरात सातत्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घटत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, अद्यापही संबंधित शाळांवर कडक कारवाई झालेली नाही. त्याबाबत शिक्षण संचालकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. या आठवडय़ात वारजे, वानवडी येथील शाळेची प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती माने यांनी दिली. या शाळांवरील कारवाईची दिशा ठरवण्याबाबत येत्या आठवडय़ात त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्यात येईल, असे माने यांनी सांगितले. शाळांच्या बसमध्ये महिला मदतनीस असणे अपेक्षित असतानाही अनेक शाळांनी अद्याप मदतनीस नेमलेले नाहीत. अशा शाळांची चौकशी करण्यात येणार असल्याचे माने म्हणाले.
शहरातील आंतरराष्ट्रीय शाळांची माहिती घेण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय असल्याचे सांगणाऱ्या शाळा कोणत्या बोर्डाच्या असतात, त्या शिक्षण हक्क कायद्याचे निकष पाळतात का, युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन (युडाएस) या संगणक प्रणालीला शाळांकडून माहिती दिली जाते का, याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसांत याबाबत समिती नेमण्यात येणार असल्याची माहितीही माने यांनी दिली.