पुणे विभागातील शेकडो शिक्षकांना देण्यात आलेल्या मान्यता संशयास्पद असून अशा शिक्षकांची यादी तयार करून त्यांच्या वेतनाचे तपशील शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून मागवण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
शासनाने २०१२ नंतर शिक्षक भरतीला मान्यता दिली नव्हती. मात्र या कालावधीतही काही शिक्षणसंस्थांकडून भरती करण्यात आली आणि ही पदे मान्य करून त्यांचे वेतनही सुरू करण्यात आले. आता शिक्षक मान्यतेच्या प्रकरणांची शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून झाडाझडती सुरू झाल्यानंतर आता शिक्षक मान्यतेमध्ये झालेले गैरप्रकार समोर येत आहेत. मान्यतेबाबतची अनेक संशयास्पद प्रकरणे बाहेर येत आहेत. पुणे विभागातही अशा काही शिक्षकांना दिलेल्या मान्यता संशयास्पद असल्याचे समोर येत आहे. पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्य़ांमधील ११८ शिक्षकांच्या मान्यता सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहेत. या शिक्षकांची यादी विभागाने तयार केली आहे. आयुक्त कार्यालयाकडून या शिक्षकांच्या वेतनाचे, थकित वेतन बिलांचे तपशील मागवण्यात आले आहेत.
‘सध्या शिक्षक मान्यतेच्या प्रकरणांची आयुक्त कार्यालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. या शिक्षकांचे वेतन सध्या थांबवण्याच्या काही सूचना नाहीत. मात्र त्यांच्या यातील काही मान्यता नियमबाह्य़ असल्याचे सिद्ध झाल्यास त्या रद्द होऊ शकतात,’ असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.