पुणे : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिकण्यासाठी ‘एआय साथी’ हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत आहे. त्याशिवाय आता ‘सायबर हायजिन प्रॅक्टिसेस : पर्सनल डिजिटल डिव्हाइस बी १०’ या अभ्यासक्रमाची भर पडली असून, मार्च २०२७पर्यंत शिक्षकांना हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या उपसंचालक ज्योती शिंदे यांनी याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या निष्ठा कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७मधील ‘सायबर हायजिन प्रॅक्टिसेस पर्सनल डिजिटल डिव्हाइस बी १०’ हा अभ्यासक्रम ‘दीक्षा’ या मंचावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यासाठी उपलब्ध आहे. अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. नोंदणी करण्यासाठी १० मार्चपर्यंत, तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १५ मार्चपर्यंतची मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार दिलेल्या मुदतीत अभ्यासक्रमासाठी नोंदणी करून तो पूर्ण करण्याबाबत कार्यवाहीसाठीच्या सूचना शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, महापालिका प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे देण्यासाठी एआय साथी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत, तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने प्रशिक्षण, अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. ते प्रत्यक्ष कामकाजात उपयुक्तही ठरतात. मात्र, शालेय कामकाज, विविध उपक्रम राबवताना हे प्रशिक्षण, अभ्यासक्रम करणे अडचणीचे ठरते. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी उन्हाळी सुटीच्या कालावधीत असे अभ्यासक्रम, प्रशिक्षण राबवणे शिक्षकांसाठी सोईस्कर ठरू शकते, अशी भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली.