लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोकसभा निवडणूक काळात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष गणपत जोशी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, जोशी यांचा मृत्यू होऊन चार-पाच दिवसांनंतरही जिल्हा निवडणूक शाखेकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जोशी कुटुंबीय आणि शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली.

संतोष जोशी हे खेड तालुक्यातील मोई विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १३ मे रोजी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हडपसर येथील कोंढवा येथे सर्व साहित्य घेऊन पोहोचल्यानंतर मतदान केंद्रातच जोशी यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना संत ज्ञानेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी (१५ मे) साडेअकरा वाजता दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यानंतर चार-पाच दिवसांनंतरही मदतीबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचे जोशी यांचे कुटुंबीय आणि शिक्षक संघटनेकडून सांगण्यात आले. पुढील निवडणुकांच्या कामकाजात ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव रामदास रेटवडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

आणखी वाचा-पिंपरीतील सशुल्क वाहनतळ धोरण बासनात, प्रायोगिक तत्त्वावरील योजनेची मुदत संपली

याबाबत बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक कर्तव्यावर असताना एखादा कर्मचारी, अधिकारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून प्रस्ताव पाठविला जाईल. त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल.’

संतोष जोशी यांचा निवडणूक कामकाजादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. यासाठी गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांना प्रस्ताव तयार करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच हा प्रस्ताव निवडणूक आयोग, संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. -मदन जोगदंड, सह निवडणूक अधिकारी

जिल्हा प्रशासनाकडून जोशी यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्यात येईल. लवकरच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल. याबाबत पाठपुरावा करू. -डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी