अवकाश मोहिमेत अवकाशयानात काही बिघाड झाला, तर काय करतात?.. अवकाशयानाशी पृथ्वीवरून संपर्क कसा साधला जातो?.. अवकाशयान पृथ्वीवर उतरवताना पाण्यावर उतरवावे लागल्यास काय करतात?.. लहान मुलांच्या कुतूहलातून येणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुण्यातील सहा शिक्षिका अगदी तयार झाल्या आहेत. कारण या शिक्षिका ‘यू.एस. स्पेस अँड रॉकेट सेंटर’ मधून स्वत:च अंतराळवीर होण्याचा अनुभव घेऊन आल्या आहेत.
पुण्यातील सहा शिक्षिकांना ‘हनिवेल एज्युकेटर्स अॅट स्पेस अॅकॅडमी’ या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. हा उपक्रम माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी असून त्यातील प्रशिक्षणाच्या साहाय्याने त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचे अध्यापन रंजक पद्धतीने करावे, अशी उपक्रमाची संकल्पना आहे. २४ देशांमधून २०५ शिक्षकांची या उपक्रमासाठी निवड झाली होती, त्यात १६ शिक्षक भारतातील होते. विद्या व्हॅली शाळेच्या शिक्षिका जोयिता अधिकारी, अपरूपा घोष, सीमा शर्मा, विखे पाटील शाळेच्या किरण जाधव, विब्गयॉर शाळेच्या अनुभा रामगोपाल आणि संस्कृती शाळेच्या नेहा तेरेदेसाई यांची या उपक्रमात निवड झाली होती.
साध्या स्ट्रॉपासून रॉकेटचे मॉडेल कसे करावे इथपासून अवकाशात सोडलेल्या उपग्रहातील बिघाडाची दुरुस्ती कशी केली जाते इथपर्यंतचे वेगवेगळे अनुभव या शिक्षकांना घेता आले. ‘हाय परफॉर्मन्स जेट सिम्युलेशन’, ‘सिनॅरिओ बेस्ड स्पेस मिशन’, ‘इंटरॅक्टिव्ह फ्लाइट डायनॅमिक्स प्रोग्रॅम’ अशा गोष्टींचा उपक्रमात समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2015 रोजी प्रकाशित
शिक्षकांनी घेतला अंतराळवीर होण्याचा अनुभव
साध्या स्ट्रॉपासून रॉकेटचे मॉडेल कसे करावे इथपासून अवकाशात सोडलेल्या उपग्रहातील बिघाडाची दुरुस्ती कशी केली जाते इथपर्यंतचे वेगवेगळे अनुभव या शिक्षकांना घेता आले.

First published on: 18-07-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers space rocket science