पुणे : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसेल, तेथील सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) हा निर्णय घेतला आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी याबाबत विभागीय मंडळांना आदेश दिले आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी कॉपीमुक्त अभियान राबवण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार, परीक्षेसाठी निश्चित केलेल्या सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांतून करण्याच्या सूचना राज्य मंडळाने विभागीय मंडळांना पत्राद्वारे दिल्या होत्या. मात्र, सरसकट सर्व कर्मचारी बदलण्यास विरोध करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळ, शिक्षक, मुख्याध्यापक संघटना यांच्या सहविचार सभेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांची अदलाबदल केल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील पाचवी ते नववी या वर्गांचे कामकाज करणे कठीण होईल, प्रत्येक पेपरसाठी अन्य परीक्षा केंद्रावर जाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे होईल, त्यावर होणारा खर्च आणि इतर बाबी विचारात घेऊन सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली न करता सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत, त्या केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव राज्य मंडळाने शालेय शिक्षण विभागाला दिला होता. या प्रस्तावाला शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

बहुतांश परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा निर्णय योग्य नाही. परीक्षेवर देखरेख करणाऱ्या यंत्रणेवर राज्य मंडळ आणि शिक्षण विभागाने विश्वास दाखवला पाहिजे.- तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ