पुणे : पुणे महानगनर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) वाहतूक उत्कृष्टता आणि शहर नियोजन केंद्राची  (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅन्ड अर्बन प्लॅनिंग) स्थापना केली आहे. यात वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून भविष्यवेधी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यातील ध्येय धोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी शिक्षणसंस्थांशी सामंजस्य करार करण्यात आला. तसेच पाठय़वृत्तीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विविध विभागात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पीएमपीएमएलला भेडसावणाऱ्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत.

सिम्बायोसिस विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी), इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) यांच्यासह पीएमपीएमएलने गुरुवारी सामंजस्य करार केला. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, सिम्बायोसिसच्या सहायक प्राध्यापक स्वाती विसपुते, आयटीडीपीचे प्रांजल कुलकर्णी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, एसटीपीआयचे संचालक संजय गुप्ता, सीओईपीच्या अधिष्ठाता अर्चना ठोसर, आयटीडीपीचे सिद्धार्थ गोडबोले आदी या वेळी उपस्थित होते.

मिश्रा म्हणाले, की पीएमपीएमएलला आता नवीन स्वरूप देण्याची गरज आहे. अद्ययावत होणे ही एक प्रक्रिया असल्याने पीएमपीएमएल अद्ययावत होत आहे. या प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी, या अडचणींवर उपाय काय हे सामंजस्य कराराद्वारे समजून घेण्यास मदत होईल. सीओईपीमध्ये वाहतूक अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू केला असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल, असे डॉ. आहुजा यांनी नमूद केले.