पुणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता विविध परीक्षा ऑफलाइन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) अखत्यारितील औषधनिर्माणशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा ८ ते २८ जून दरम्यान होणार असून, तीन तासांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त अर्धा तास दिला जाणार आहे.


एमएसबीटीईचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी या संदर्भात परिपत्रकाद्वारे माहिती दिली.करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती.


या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.