रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता ;तापमानात घट ; आठवडाभर कोरडे हवामान

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील ढगाळ वातावरणही एक-दोन दिवसांत दूर होऊन सर्वत्र आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे.

पुणे : अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असल्याने कोकणासह राज्यात आता सर्वत्र कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.

सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असून, अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान सध्या सरासरीच्या तुलनेत घटलेले असले तरी ते दोन दिवसांत पूर्ववत होण्याचा अंदाज आहे.  अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर बाष्प जमिनीकडे आल्याने राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही भागांत या स्थितीमुळे जोरदार पाऊस झाला.  मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे तेथील रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील ढगाळ वातावरणही एक-दोन दिवसांत दूर होऊन सर्वत्र आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे. कोरडय़ा हवामानामुळे सध्या मराठवाडा आणि विदर्भात दिवसाचे कमाल तापमान सरासरीजवळ आले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ते अद्यापही सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे या भागात दिवसा हवेत किंचित गारवा आहे. थंडीची चाहूल?  राज्यात सर्वत्र रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेली रात्रीची थंडी जाणवत नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत ते सरासरीजवळ किंवा त्याखाली जाण्याची शक्यता असल्याने रात्रीचा गारवा वाढणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Temperature at night likely get drop in maharashtra zws