सातत्याने चाळिशीकडे सरकणाऱ्या पाऱ्यामुळे पुणेकरांना घामाच्या धारा लागल्या असल्या, तरी या वातावरणाचा एक संभाव्य फायदा आहे! गुढीपाडव्यापूर्वीच बाजारात आंब्यांची नियमित आवक सुरू झाली आहे. आंबे पिकवायचे कसे हा प्रश्न यंदा बहुतांशी अधिक तापमानानेच सोडवला असून आंबा पिकवण्यासाठी केला जाणारा ‘कॅल्शियम कार्बाइड’चा वापर या वातावरणामुळे कमी होऊ शकेल, असे आंबा व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे.
आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापराबाबत केलेल्या कारवाईत गेल्या तीन वर्षांत अन्न व औष विभागाने पुणे विभागातून आंब्यांचे ५० नमुने घेतले होते. विश्लेषणानंतर यातील १६ नमुने खाण्यासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आले. एफडीएने या तीन वर्षांत एकूण १३ लाख ५० हजार रुपयांचा आंब्यांचा साठा जप्त केला, तसेच असुरक्षित नमुन्यांच्या १६ प्रकरणांमध्ये संबंधितांवर खटले दाखल केले. आंबा अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेर असला तरी तो बाजारात आला असून गुढीपाडव्यानंतर आवक मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्यामुळे कॅल्शियम कार्बाइडच्या वापराचा प्रश्नही ऐरणीवर आहे.
एफडीएची गेल्या वर्षीची कारवाई व यंदाचे तापमान पाहता या वर्षी आंबा विक्रेते कॅल्शियम कार्बाइडकडे वळतील असे वाटत नाही, असे ‘सुर्वे बंधू आंबेवाले’ या पेढीचे प्रवीण सुर्वे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘तापमान कमी असते तेव्हा आंबे तयार व्हायचा प्रश्न येतो. पण यंदा उष्णता प्रचंड आहे व ती तशीच राहिली, तर आंबा पिकवण्यासाठी इथिलिन गॅस चेंबर्स वापरण्याचीही गरज भासणार नाही असे वाटते. अर्थात म्हणून पुण्यात इथिलिन चेंबर सहजतेने उपलब्ध आहेत असे नाही. परंतु उष्ण तापमानामुळे त्याकडे लक्षही न जाण्यासारखी परिस्थिती आहे.’
गेली तीन वर्षे जानेवारीच्या दुसऱ्याच आठवडय़ात आंबा बाजारात येत असून अक्षय्यतृतीयेपर्यंत आंब्यांच्या हंगाम ७० टक्के पूर्ण झालेला असतो. रविवारी पुण्याच्या बाजारात साधारणत: दोन हजार पेटय़ा आंब्यांची आवक झाली असून गेले तीन दिवस दररोज १००० ते १२०० पेटय़ा येत असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली.
अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, ‘कॅल्शियम कार्बाइड सहज व स्वस्त दरात उपलब्ध असल्याने आंबे पिकवण्यासाठी त्याचा वापर होतो. या वापरावर बंदी असून त्या ऐवजी नैसर्गिक रीत्या व इथिलिन गॅस चेंबरमध्ये आंबा पिकवता येतो. कॅल्शियम कार्बाइडची पुडी टाकून पिकवलेल्या आंब्याचा वरचा भाग पिवळा व गोड लागतो, पण कोईकडे आंबा कच्चाच राहतो, शिवाय त्यात फळाची नैसर्गिक गुणवत्ताही नसते.’