अनेक ठिकाणी तापमान; ४२-४३ अंश सेल्सिअस

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी जाणवणाऱ्या कडक उन्हाच्या झळा कायम राहिल्या आहेत. गुरुवारीही किनारपट्टी भाग वगळता राज्यभर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच राहिले. विदर्भ-मराठवाडय़ात तर अनेक ठिकाणी ते ४२ ते ४३ अंश होते.

दिवसा त्रासदायक ठरणाऱ्या उन्हाळय़ाबरोबर किमान तापमानही अधिक राहात असल्याने रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला (४४.१) येथे होते. विदर्भ आणि मराठवाडय़ात अक्षरश: उन्हाची काहिली जाणवते आहे. जवळपास सगळीकडे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक आहे. मध्य महाराष्ट्रातही तापमानात लक्षणीय वाढ दिसते आहे. गुरुवारी ब्रह्मपुरी (४३.९ अंश), वर्धा (४३.५ अंश), अहमदनगर, जळगाव व मालेगाव (४३.२ अंश), परभणी (४३.१ अंश), नांदेड (४३ अंश), नागपूर (४२.८ अंश), चंद्रपूर व गोंदिया (४२.६ अंश), यवतमाळ (४२.५ अंश), सोलापूर (४२.२ अंश) या सर्वच ठिकाणी चढे तापमान होते. उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, अमरावती या ठिकाणीही कमाल तापमान ४१ व ४२ अंशांच्या दरम्यान राहिले, तर पुणे, लोहगाव, नाशिक, सांगली, सातारा, बुलढाणा या ठिकाणी ते ४० अंशांच्या वर गेले होते.

पुणे ४०.१ अंश; लोहगाव ४१ अंश सेल्सिअस

पुण्यात शुक्रवारी ४०.१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली, तर लोहगाव येथे ४१ अंश सेल्सिअस तापमान होते. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारीही शहरात असेच तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर रविवापर्यंत ते काहीसे कमी होऊन ३७ अंशांवर उतरेल. मात्र,नंतर तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.