जवळपास सर्व ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर

राज्यभर उन्हाचे भाजून काढणारे चटके बसू लागले आहेत. विदर्भ-मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रातही जवळपास सर्वच ठिकाणी दिवसाचे तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. भिरा गावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारीही कायम राहिली असून विदर्भ आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी तापमान ४१ अंशांच्या वर होते.

मार्च महिन्याच्या शेवटी राज्यभर कमाल तापमान त्रासदायक रीत्या वाढले होते. दुपारी उन्हाचे चटके आणि रात्रीही प्रचंड उकाडा असे चित्र होते. तेच आता पुन्हा अनुभवास येत आहे. राज्यात मंगळवारीही सर्वाधिक तापमान भिरा येथेच (४४.५ अंश सेल्सिअस) होते. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक होते. अकोला येथे (४२.९ अंश), चंद्रपूर (४२.८ अंश), ब्रह्मपुरी (४२.२ अंश), वर्धा (४२.५ अंश), नागपूर (४२ अंश), अमरावती (४१.४ अंश), गोंदिया (४१.२ अंश), यवतमाळ (४१ अंश) असे चढे तापमान राहिले. तर बुलडाणा आणि वाशिम येथे ते चाळिशीच्या जवळ होते. मराठवाडय़ातही परभणी आणि नांदेड येथे ४२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली, तर उस्मानाबादमध्ये तापमान ४१.४ अंश राहिले. औरंगाबाद आणि बीडमध्येही तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला होता. मध्य महाराष्ट्रात थंड हवेचे महाबळेश्वर सोडता सर्व ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर गेले. मालेगाव (४२.६ अंश), जळगाव (४२.४ अंश) आणि अहमदनगर (४२.२ अंश), सोलापूर (४१.९ अंश), तर सांगली येथे ४१ अंश तापमान नोंदले गेले.

पुण्यात ४०.१ अंश, तर लोहगावमध्ये ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे व परिसरात आणखी दोन दिवस तरी तापमान अधिकच राहील अशी शक्यता ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) वर्तवली आहे. त्यानंतर ते २ ते ३ अंशांनी कमी होऊ शकेल.