पुणे : शहर आणि उपनगरांत तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मंगळवारी पुण्यात १२.७, तर बुधवारी ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शहरासह विविध उपनगरांमध्येही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेले आहे. त्यामुळे हवेतील आद्र्रता कमी झाली आहे. तसेच उत्तर-पूर्वेकडील वाऱ्याचा दाब वाढल्याने राज्यातील किमान तापमानात घट जाणवत

आहे. आकाश स्वच्छ झाल्याने दिवाळीनंतर शहरातील तापमानात घट दिसून येत आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळी शहरातील सर्वच भागातील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घट झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. परिणामी पहाटे शहराच्या बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीबरोबरच धुके पडल्याचेही पाहायला मिळाले. बुधवारी शहरात सर्वात कमी तापमान शिवाजीनगर येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

शहर आणि परिसरात रविवापर्यंत थंडी कायम राहणार असून त्यानंतर ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात किंचितशी वाढ होत, थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात शहरात थंडीने जोर धरला आहे. शहरात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव येथे सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअस घट झाली आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास शहरात मोठय़ा प्रमाणावर थंडी पडत आहे. पुढील काही दिवस आकाश निरभ्र, हवामान कोरडे राहणार असून, या काळात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहर आणि परिसरातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये

शिवाजीनगर ११.८, पाषाण १०.८, वडगाव शेरी १९.६, एनडीए ११.५, मगरपट्टा १८.८, लवळे १६.२, तळेगाव १३.८, चिंचवड १७.६