दत्ता जाधव, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : तापमानवाढीमागे अनेक कारणे असली तरी भारतात परदेशी वृक्षांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. ऐन उन्हाळय़ात परदेशी झाडांची पानगळ होते. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यांत सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडतात. परिणामी, जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ या पर्यावरणासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल दिलावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशी झाडांची पानगळ शिशिर ऋतूत (माघ, फाल्गुन) म्हणजे हिवाळय़ात होते. सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, त्यामुळे पानांतील हरितद्रव्य कमी होऊन पाने पिवळी पडून गळून पडतात. वसंत ऋतूत देशी झाडांना पालवी फुटते, झाडे हिरवीगार होतात. उन्हाळय़ात देशी झाडांची पाने सूर्याच्या प्रखर किरणांना जमिनीवर पोहोचण्यापासून अडवतात आणि जमिनीचे तापमान वाढण्यास प्रतिबंध होतो. देशी झाडे तापमानवाढ रोखण्यास मदत करतात.

परदेशी झाडांची पानगळ मात्र वसंत ऋतूत (चैत्र, वैशाख) म्हणजे ऐन उन्हाळय़ात होते. त्यामुळे उन्हाळय़ात सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडतात आणि जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते. परिणामी, स्थानिक पातळीवरील तापमान वाढ रोखण्यात परदेशी झाडे निरुपयोगी ठरतात, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे लावण्याची मोहीम राज्यात राबविली गेली. या मोहिमेत अनेक परदेशी झाडांची लागवड केली गेली. माळराने केवळ हिरवीगार व्हावीत, यासाठी आकेशिया जातीच्या झाडांची लागवड मोठय़ा प्रमाणात झाली. पण, ही झाडे जमिनीतील पाणी मोठय़ा प्रमाणावर शोषून घेतात, ती पर्यावरणास हानी पोहोचवतात, असे पर्यावरण सल्लागार डॉ. विकास जाधव यांनी सांगितले.

देशात ४० टक्के वृक्षसंपदा विदेशी

* देशातील एकूण वृक्षसंपदेच्या सुमारे ४० टक्के झाडे परदेशी असल्याचा ‘नेचर फॉरएव्हर’चा दावा

* देशातील परदेशी झाडांपैकी ५५ टक्के अमेरिकेतील, १० टक्के आफ्रिकेतील, १५ टक्के युरोपातील आणि २० टक्के ऑस्ट्रेलियातील

* देशातील परदेशी झाडांच्या जातींची संख्या सुमारे १८ हजारांवर. पैकी २५ टक्के पर्यावरणाला अधिक मारक

* गुजरात, गोवा, केरळ आणि ईशान्येकडील राज्ये वगळता अन्य राज्यांत परदेशी झाडांची संख्या मोठी 

परदेशी झाडे स्थानिक पर्यावरणाला हानीकारकच आहेत. किमान आता तरी वन विभागाने पुढाकार घेऊन जागृती करावी, जेणेकरून देशी झाडांची लागवड वाढेल आणि पर्यावरणाला चालना मिळेल. 

डॉ. विकास जाधव, पर्यावरण सल्लागार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature rise due to exotic trees claim researchers zws
First published on: 16-05-2022 at 02:25 IST