पुणे : बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प आणि पश्चिम-दक्षिण भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची हजेरी असतानाच दुसरीकडे तापमानातील वाढ कायम आहे. पुढील दोन दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली. पावसाळी स्थितीमुळे या भागातील तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, कोल्हापूर आदी भागांत रविवारी पावसाची नोंद झाली. या भागातील तापमान सरासरीच्या खाली आले असले, तरी रात्री उकाडा जाणवत आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात मोठी वाढ होत आहे. शनिवारी जळगाव येथे देशातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पावसाळी वातावरणामुळे सध्या तापमानात काही प्रमाणात घट असली, तरी विदर्भात ते ४० ते ४२ आणि मराठवाडय़ात ४० अंशांच्या आसपास आहे. मुंबईसह कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या पुढे आहे. पुढील दोन दिवसांमध्ये उत्तर-दक्षिण भारतामध्ये तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार आहे. गुजरातमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मध्य प्रदेशमध्येही २ ते ३ दिवसांत तापमान ३ अंशांनी वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही कमाल तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भात काही भागात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी २६ एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.