निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार आहेत. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीत जाण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपीटही झाली. या कालावधीत कमाल तापमानात घट झाल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाल्याने तापमानात हळूहळू वाढ सुरू झाली आहे. बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या पुढे जाऊ लागले आहे. त्याचप्रमाणे काही भागांत संध्याकाळनंतर आकाश अंशत: ढगाळ होत असल्याने किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी अनेक ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे जाऊन चाळिशीत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा मराठवाडामार्गे गेला आहे. सध्या दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाळी वातावरण आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

ब्रह्मपुरी ४३ अंशांवर

विदर्भात सध्या सर्वच ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांदरम्यान किंवा त्यापुढे आहे. ब्रह्मपुरी येथे सोमवारी राज्यातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारीही या ठिकाणी ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. ते देशातील उच्चांकी तापमान ठरले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperatures in the state are expected to rise by another 2 to 3 degrees abn
First published on: 20-04-2021 at 00:39 IST