लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ रसायनाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला मध्यरात्री अचानक आग लागली. टेम्पो चालक आणि मदतीनीस त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. आग भडकल्यानंतर बोर घाट महामार्ग पोलिसांनी घाटक्षेत्रातील वाहतूक दोन्ही बाजुने थांबविली.

भिवंडीतून हैद्राबादकडे मध्यरात्री रसायन घेऊन निघालेल्या टेम्पोने खोपोलीजवळ अचानक पेट घेतला. आग भडकल्यानंतर बोरघाट महामार्ग पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे आणि सहकाऱ्यांनी घाटक्षेत्रातील दोन्ही बाजुची वाहतूक थांबविली. खोपोलीतील अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर देवदूत पथक, एमआयडीसी पातळगंगा, उत्तम कंपनी, टाटा स्टील, एचपीसीएल कंपनीतील अग्निशमन यंत्रणा असलेले बंब घटनास्थळी दाखल झाले.

रसायनांचा टेम्पोने पेट घेतल्यानंतर अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. खोपोली अग्निशमन दलातील अधिकारी हरी सूर्यवंशी आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेतील कार्यकर्त्यांनी सहाय केले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आयआरबीचे पथक, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा दल, गृहरक्षक दलाच्या जवान मदतकार्यात सहभागी झाले होते. टेम्पोने पेट घेतल्यानंतर मुंबई-पुणे मार्गिकेवर दोन्ही बाजूंना कोंडी झाली होती. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.