यासीन भटकळला चौदा दिवसांची कोठडी -जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी यासिन भटकळ याला चौदा दिवस पोलीस कोठडी मिळाली अाहे.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी मोहंमद अहमद मोहंमद जरार सिद्दीबाप्पा उर्फ यासिन भटकळ (रा. भटकळ, कर्नाटक) याला शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी भटकळ याला चौदा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तपासामध्ये भटकळकडून जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटासंबंधीच्या अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० साली बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता आणि ५६ जण जखमी झाले होते. या गुन्ह्य़ात अटक असलेल्या मिर्झा हिमायत बेग (वय २९, रा. उदगीर, लातूर) याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याने उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्य़ात भटकळ याला मुंबईच्या विशेष न्यायालयातून गुरूवारी पुणे पोलिसांकडे वर्ग करून घेण्यात आले होते. त्याला शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तामध्ये बुरखा घालून विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
 दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त आणि तपास अधिकारी शांताराम तायडे यांनी न्यायालयास आरोपीची माहिती दिली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट हा इंडियन मुजाहिदीन व लष्कर ए तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या सदस्यांनी एकत्र येऊन, कट रचून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत शिक्षा झालेल्या आणि फरार आरोपींचा समावेश आहे. आरोपी मोहंमद अहमद मोहमंद जरार सिद्दीबाप्पा उर्फ अहमद उर्फ इम्रान उर्फ यासीन भटकळ उर्फ शिवानंद हा त्यापैकी एक आहे. जर्मन बेकरीत यासीन भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच गुन्हा घडल्यापासून तो फरारी होता. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचे फरारी म्हणून नाव आहे. अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता तो विश्वासार्ह माहिती देत नसल्याचे आढळून आले आहे.
 या खटल्यातील विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी भटकळ याला तपासासाठी चौदा दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ‘भटकळ हा कट्टर दहशतवादी असून तो इंडियन मुजाहिदीन संघटनेचा सदस्य आहे. त्याने जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी बॉम्ब बनविण्याकरता आवश्यक असणारे आरडीएक्स कोठून आणले, गुन्हा केल्यानंतर आरोपी बराच काळ फरार होता, त्या मुदतीत त्याने देशात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट केले आहेत, त्यासाठी त्याने केलेल्या हालचालींबाबतची माहिती घ्यायची आहे. या गुन्ह्य़ातील फरारी आरोपींच्या ठावठिकाणाबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे. भटकळ फरार आरोपींबरोबर संवाद साधताना कोणत्या पद्धतीचा वापर करीत होता, याची माहिती फक्त त्यालाच आहे. त्याबाबत तपास करायचा आहे. जर्मन बेकरीच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात तो दिसत आहे. त्यामुळे या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे,’ असा युक्तिवाद राजा ठाकरे यांनी केला.
न्यायालयाने भटकळ याला पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने ‘कुछ नही’ असे सांगितले. त्याने वकील न दिल्यामुळे न्यायालयानेच अॅड. आय.पी.एस. गील यांची भटकळचे वकील म्हणून नियुक्ती केली. अॅड. गील यांनी भटकळशी काही वेळ बोलण्यासाठी मुदत मागितली. काही मिनिटे बोलल्यानंतर त्यांनी न्यायालयास सांगितले की, भटकळ हा २८ ऑगस्ट २०१३ पासून विविध गुन्ह्य़ात पोलीस कोठडीत आहे. या काळात त्याच्याकडे भरपूर तपास झाला आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भटकळ याला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात येत असल्याचे सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Terrorist yasin bhatkal gets 14 day police custody

ताज्या बातम्या