पुणे : ऑनलाइन पेपर कसे फोडावेत, याच्या विविध पद्धतींबाबतचे प्रशिक्षण बिहारमधील पटना येथे दिले जात असल्याचे सायबर पोलिसांनी उघड केल्यानंतर आता सायबर पोलिसांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा – टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) गैरव्यवहाराचा कट दिल्ली येथे शिजल्याची माहिती उघडकीस आणली आहे. दिल्लीत सन २०१७ मध्ये संशयित आरोपी सौरभ त्रिपाठी, अभिषेक सावरीकर आणि प्रीतेश देशमुख यांची बैठक झाली होती. येथेच टीईटी परीक्षेत अपात्र परीक्षार्थीना पात्र करण्याचा कट शिजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे टीईटी गैरव्यवहारांचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
संतोष हरकळ याच्याकडे केलेल्या तपासात त्याने सुरंजित पाटील, स्वप्नील पाटील, मुकुंद सूर्यवंशी, कलीम खान व अशोक मिसाळ यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये टीईटी २०१८ च्या परीक्षेतील परीक्षार्थीचे गुण वाढविण्यासाठी एकूण ६५० परीक्षार्थीची यादी तयार केली. ती पेनड्राइव्हमध्ये घेत शिवाजीनगर येथील आलिशान हॉटेलमध्ये प्रीतेश देशमुख याला दिली गेल्याचे तपासातून समोर आले आहे. तर, टीईटी गैरव्यवहार प्रकरणी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याच्या सांगण्यावरून दलाल अंकुश हरकळ याने सुरंजित पाटील, स्वप्नील पाटील यांच्यासह इतरांकडून जमा केलेली पाच कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम बेंगळुरु येथील कंपनीचा संचालक अश्विनकुमार याला दिली असल्याचेही तपासात समोर आले आहे.
काही जण १५ वर्षांपासून सक्रिय?
ज्या परीक्षार्थीकडून गुण वाढविण्यासाठी रकमा गोळा केल्या गेल्या, ते परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले, याचा सायबर पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. सध्या संबंधित परीक्षार्थीचे नाव आणि परीक्षेतील आसन क्रमांकाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. यानंतरच टीईटी गैरव्यवहाराचा आणखी उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. काही आरोपींचे संबंध हे भारतातील विविध परीक्षा फुटीशी असून १५ वर्षांपासून काही जण सक्रिय असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी ऑनलाइन पेपर फोडण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याची शक्यता असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
अटक आरोपी..
सुखदेव डेरे, अश्विनकुमार शिवकुमार, सौरभ त्रिपाठी, निखिल कदम, अभिषेक सावरीकर, संतोष हरकळ, तुकाराम सुपे, डॉ. प्रीतेश देशमुख, सुरंजित पाटील आणि स्वप्निल राजपूत