पुणे : राज्यात रविवारी ( २८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना आज उघडकीस आली. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.  या ‘टीईटी’साठी उच्चांकी ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी मिळून पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण ६ लाख १२५ अर्ज केले आहेत. नोंदणी केलेल्यांमध्ये २ लाख २६ हजार २६३ कार्यरत शिक्षकांचा समावेश आहे. मात्र पेपटफुटीमुळे रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

टीईटी परीक्षेत गैरप्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही या परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आले आहेत. २०१९च्या टीईटीमध्ये ७ हजार ८७४ उमेदवारांचा गैरप्रकारात सहभाग होता. तर २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केले होते. त्यामुळे संबंधित 9 हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय गेल्यावर्षी, गेल्यावर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या टीईटीमध्ये मुरगुड येथील पोलिस ठाण्यात परीक्षेतील गैरप्रकाराबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या परीक्षेत ज्या उमेदवारांनी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, अशा २२ उमेदवारांची परीक्षे संपादणूक रद्द करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली. आता भिवंडी येथे पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला आहे.

परीक्षा परिषदेने २८ जून रोजीच्या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना केल्या होत्या. त्यात उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचा वाहन परवाना यांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र आणि वर दिलेल्या वैध ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. तसेच टीईटी परीक्षेवेळी महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब, दुपट्टा वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, परीक्षा कक्षात उमेदवाराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसावा यासाठी परीक्षा कालावधीत वर्गखोलीत उमेदवाराला मानेच्या वर म्हणजेच कान, चेहरा, तोंडावर कोणत्याही प्रकारचे आवरण असता कामा नये. तसेच, परीक्षा कक्षात कोणत्याही प्रकारचे बूट वापरण्यास परवानगी असणार नाही. चप्पल, सँडल, स्लीपर अशा स्वरुपाची उघडी पादत्राणे वापरण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो व्ह्यू, कनेक्ट व्ह्यू या प्रणालीचा वापर करण्यात येणार होता. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला आहे.