पुणे : राज्यातील शासकीय, अनुदानित शाळांतील शिक्षकांप्रमाणेच आता खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेची तपासणी आता शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. यूडायस प्रणालीद्वारे शिक्षक, शिक्षण संस्थांना शिक्षकांच्या टीईटी पात्रतेबाबतची माहिती पाठवण्याच्या, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत शिक्षकांची टीईटी पात्रता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
राज्यात शासकीय शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळा आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना टीईटी पात्र असणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यानुसार कार्यरत असलेल्या शिक्षकांना टीईटी पात्र होण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, देशातील पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना टीईटी पात्र असणे बंधनकारक असल्याचा निकाल गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला. शिक्षकांना टीईटी पात्रता प्राप्त करण्यासाठी ऑगस्ट २०२८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. टीईटी पात्रता बंधनकारक झाल्यामुळे राज्य परीक्षा परिषदेच्या टीईटी परीक्षेच्या नोंदणीतही वाढ झाली आहे.
यूडायस अहवालानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मिळून सुमारे ७ लाखांहून अधिक शिक्षक आहेत. आतापर्यंत टीईटी पात्रतेची चर्चा शासकीय शाळांतील शिक्षकांच्या संदर्भातच होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांत शिकवणाऱ्या शिक्षकांच्या टीईटी पात्रतेकडे अद्याप शिक्षण विभागाने फारसे लक्ष दिलेले नाही. तसेच खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतीळ किती शिक्षक टीईटी पात्र आहेत याची आकडेवारीही शिक्षण विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेची पडताळणी शिक्षण विभागाकडून केली जाणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.
राज्यातील खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेबाबतची तपासणी आता केली जाणार आहे. टीईटी पात्रता सर्वच शिक्षकांना लागू आहे. त्यामुळे खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०२८ पर्यंतची मुदत असणार आहे. त्यामुळे यूडायस प्रणालीद्वारे शिक्षण संस्था, शिक्षकांकडून टीईटी पात्रतेबाबतची माहिती संकलित करण्यात येईल. तसेच टीईटी पात्रता पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात येतील. – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
