scorecardresearch

TET Exam Scam : आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला पुणे सायबर पोलिसांकडून अटक

ठाण्यातून अटक करण्यात आली आहे ; या प्रकरणातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणी आज (शनिवार) पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला ठाण्यातून अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना आज दुपारी ठाण्यातून अटक केली. ते २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून ते कार्यरत होते. तर, शिक्षक भरती परीक्षेतील गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे. या प्रकरणातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. तसेच, आता खोडवेकर यांच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, हे देखील उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना या परीक्षेतील २०१८ च्या निकालात घोटाळा झाल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे तसेच परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा तत्कालीन व्यवस्थापक सामील झाल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली असून दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केलेली आहे. परीक्षेतील निकालासाठी ५०० अपात्र परीक्षार्थींकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी सुखदेव हरी डेरे (वय ६१) तसेच जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक अश्विनीकुमार (वय ४९, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे यांच्यासह शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर तसेच संजय शाहूराव सानप यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात पसरली असून ही परीक्षा घेण्याची जबाबदारी बंगळूरुतील जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीकडे सोपविण्यात आली होती. सखोल चौकशीत शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ च्या निकालातही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे तसेच अश्विनीकुमार या गैरव्यवहारात सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, असे गुप्ता यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tet exam scam ias officer sushil khodvekar arrested by pune cyber police msr

ताज्या बातम्या