पुणे : राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केलेले शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणारे शिक्षक, पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. निवृत्त होण्यास पाच वर्षे बाकी असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली. मात्र, निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना पदोन्नती हवी असल्यास पदोन्नतीसाठी त्यांनाही टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले.
तसेच टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदासाठी जाहीर केलेल्या विभागीय परीक्षेच्या पात्रतेमध्येही टीईटी उत्तीर्ण असण्याची तरतूद नमूद केली आहे. या अनुषंगाने, प्राथमिक शिक्षण संचालकांनी शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन मिळण्याची विनंती पत्राद्वारे केली होती.
या पत्राला आता शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद माकणे यांनी पत्राद्वारे दिलेल्या उत्तरानुसार, न्यायनिर्णयाच्या संदर्भात पुढील कार्यवाहीबाबत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिपद, तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत.
तसेच न्यायनिर्णय पारीत झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षे कालावधीत टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर तूर्तास पदोन्नती देता येणार नाही. टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केलेले शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
गोसावी म्हणाले, पदोन्नतीच्या कार्यवाहीबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात आले होते. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली असल्याने दोन वर्षांच्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून पदोन्नती देण्याबाबत जिल्हा स्तरावरून, तसेच संघटनांकडून मागणी करण्यात आली होती. मात्र, आता शासनाच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येईल.
शिक्षकांच्या टीईटीबाबतच्या माहितीचे संकलन
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील टीईटी उत्तीर्ण असलेले शिक्षक, टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक यांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य, केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनीही राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांबाबतची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक स्तरावर कार्यरत शिक्षक, २०११पूर्वी रूजू झालेले शिक्षक, २०११नंतर रूजू झालेले शिक्षक, २०११पूर्वी रूजू झालेेले आणि टीईटी उत्तीर्ण असलेले शिक्षक, २०११नंतर रूजू झालेले आणि टीईटी उत्तीर्ण झालेले शिक्षक, टीईटीतून सूट दिलेले शिक्षक अशा स्वरुपातील माहितीचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
