पिंपरी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चार ऑक्टोबर रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी मोर्चाची दिशा सांगितली. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही पिंपरीत आपली भूमिका मांडली आहे.

रवींद्र चव्हाण म्हणाले, ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत मला माहित नाही. परंतु जे विषय ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या विषयाच्या अनुषंगाने घडलेला प्रकार आणि त्या घडलेल्या प्रकाराचा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुलासा केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवक्ते असतील किंवा त्याचबरोबर सर्व नेत्यांनी या संदर्भातला खुलासा केला आहे. सरकारबद्दल किंवा सरकारच्या असणाऱ्या यंत्रणेच्या संदर्भामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे चुकीची भूमिका घेऊन गेल्या काही दिवस विरोधातील असणारी ही सर्व मंडळी जात आहेत. त्यामुळे अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणे अत्यंत गरजेचे आहे.

महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. या सगळ्या आव्हानांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघे आणि त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळातील असणारे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या सर्व विषयांना मार्गस्थ करण्याचे काम करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्याच्यावरती काय उपाययोजना करायला हवी, शासन अतिशय वेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या दृष्टिकोनातून चांगले नियोजन कसे होईल याचा विचार करत असल्याचे चव्हाण म्हणाले.

सेवा संकल्प अभियानाचा आढावा

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु असलेल्या सेवा संकल्प अभियानाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर संघटनात्मक विषयांच्या संदर्भात एकत्र बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर शहरामध्ये माथाडीचा मेळावा आहे. निवडणुकीच्या नंतर काही प्रमुख पदाधिकारी यांच्या घरी प्रत्यक्षात भेटीला जाणे, असे नियोजन गेल्या काही दिवसांपासून ठरले होते. त्यामुळे अशा एकत्रपणे एक दिवस पिंपरी-चिंचवड मधील असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर संवाद करावा, त्या दृष्टिकोनातून आज पिंपरी-चिंचवडमध्ये बैठक होती आणि त्यामुळे आज या बैठकीला मी प्रत्यक्षपणे इथे उपस्थित राहिल्याचेही त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे यावेळी उपस्थित होते.