scorecardresearch

आगामी साहित्य संमेलन वर्ध्याला, साहित्य महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब

५५ वर्षांनंतर वर्ध्याला हा बहुमान मि‌ळत आहे. तर, विदर्भामध्ये गेल्या अकरा वर्षांत होणारे हे तिसरे संमेलन असेल.

पुणे : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (२९ मे) होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. वर्धा येथे ५५ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर, गेल्या अकरा वर्षांत विदर्भामध्ये होणारे हे तिसरे संमेलन असेल.

उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन जेमतेम एक महिना झाला असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आता आगामी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेचे यंदा शताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून आगामी संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान विदर्भ साहित्य संघाला देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार वर्धा येथे साहित्य संमेलन होणार असून रविवारी (२९ मे) होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी वर्धा येथे भेट देऊन पाहणी केली. आता महामंडळाच्या रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या निर्णयावर एकमत होऊन वर्ध्याची औपचारिक घोषणा होणार आहे.

साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांपैकी कोणी मागणी केली तर औचित्य पाहून संबंधित घटक संस्थेला साहित्य संमेलनाचे आयोजकपदाची संधी द्यावी, असे महामंडळाचे संकेत आहेत. विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष असून त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची इच्छा असल्याने त्यांनाच ही संधी मिळेल. त्यामुळे स्थळ निव़ड समितीने केवळ वर्धा या एकमेव स्थळाला भेट दिली आहे. महामंडळाच्या रविवारी होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाचे सदस्य आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

वर्ध्यातील दुसरे संमेलन

वर्धा येथे जानेवारीमध्ये साहित्य संमेलन होणार असून हे दुसरे संमेलन असेल. यापूर्वी १९६८ मध्ये वर्ध्याला साहित्य संमेलन झाले होते. ज्येष्ठ कवी पु. शि. रेगे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे आता ५५ वर्षांनंतर वर्ध्याला हा बहुमान मि‌ळत आहे. तर, विदर्भामध्ये गेल्या अकरा वर्षांत होणारे हे तिसरे संमेलन असेल. २०१२ मध्ये वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली आणि २०१९ मध्ये डॅा. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची इच्छा संघाने प्रदर्शित केली आहे. त्याला महामंड‌ळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महामंडळाने संमेलन स्थळ घोषित केल्यानंतर पुढील नियोजन सुरू करण्यात येणार आहे. – प्रदीप दाते, शाखा समन्वय सचिव, विदर्भ साहित्य संघ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The 96th marathi sahitya sammelan will held in wardha next year official announcement will be made tomorrow print news asj

ताज्या बातम्या