पिंपरी: दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेवून जाताना आरोपीने दोन पोलिसांना मारहाण करत चावा घेतला. नखाने ओरखडेही मारले. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास पिंगळेसौदागर येथील कोकणे चौकात घडली. याप्रकरणी खंडू जालिंदर लोंढे (वय २३, रा.रहाटनी) याला अटक केली आहे. याबाबत वाकड ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष मारुती बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. बर्गे आणि पोलीस शिपाई खेडकर शुक्रवारी गस्त घालत होते. त्यावेळी वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी खंडू हा चौकात त्यांना दिसला. त्यामुळे पोलिसांनी ओळखपत्र दाखवून आरोपी खंडू याला गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात चल असे म्हटले. त्याला नकार देत आरोपी खंडू हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी पोलीस हवालदार बर्गे आणि पोलीस शिपाई खेडकर यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयन्त केला असता त्याने दोघांना हाताने मारहाण केली. बर्गे यांच्या दोन्ही हातावर नखाने ओरखडले. दोघांच्या उजव्या हाताला मनगटाजवळ जोरात चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.