पुणे : उन्हाळी सुटीनंतर विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील शाळांमध्ये शनिवारपासून (१५ जून) पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार आहे. मात्र ‘शिक्षकांना शिकवू द्या, मुलांना शिकू द्या’ अशी मागणी करत अशैक्षणिक कामे आणि विविध निर्णयांविरोधात शिक्षकांच्या आंदोलनाने नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार आहे.

संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे शिक्षक अतिरिक्त ठरणे, शिक्षकांसाठीचा गणवेश, बदली धोरण, सातत्याने लादली जाणारी अशैक्षणिक कामे, जिल्हा परिषद, नगपालिका, महानगरपालिका शाळांना भौतिक सुविधा पुरवण्याकडे होणारे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे झालेले केंद्रीकरण, नवसाक्षरता अभियान अशा मुद्द्यांवरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये स्वागत करतानाच सरकारच्या धोरणांना शिक्षकांकडून विरोध दर्शवला जाणार आहे.

हेही वाचा >>>कल्याणीनगर अपघात प्रकरणात अगरवाल दाम्पत्यासह तिघांची येरवडा कारागृहात रवानगी

शिक्षकांना शाळेत कोणत्याही सुविधा न देता सातत्याने अशैक्षणिक कामे आणि कार्यालयीन कामे दिली जातात. सातत्याने विविध माहिती ऑनलाइन मागवली जाते. या बाबत मागणी करूनही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ द्यावा यासाठी ‘शिक्षकांना शिकवू द्या, मुलांना शिकू द्या’ अशी मागणी गेल्या काही काळात लावून धरण्यात आली आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवल्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितले.